विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रतीवर्षी अनुसूचित जाती, नवबौध्द प्रवर्गातील ७५ विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमात ७५ टक्क्यांची अट व मर्यादित निधीची अट घालण्यात आली होती. ही अट २४ जुलैच्या शासन निर्णयान्वये शासनाने शिथिल केली असल्याचे समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी जाहीर केले.
अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशात पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पी.एच.डी.) विशेष अध्ययन करण्यासाठी आर्थिक मदत देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश होय. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात आले असून शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांला अभ्यासक्रमात ७५ टक्के गुणांची अट घातली होती. याशिवाय शिक्षण शुल्काची मर्यादा पदव्युत्तर पदवीसाठी ३० लाख व पीएचडीसाठी ४० लाख रुपये होती. यामध्ये आत सूधारणा करण्यात आली असून परदेशातील पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांने भारतातील मान्यता प्राप्त विद्यापीठामधून किमान ५५ टक्के गुणांसहीत पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी तसेच पी.एच.डी. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांने भारतातील मान्यता प्राप्त विद्यापीठामधून किमान ५५ टक्के गुणांसहीत पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. परदेशातील शैक्षणिक संस्थेने ऑफर लेटर मध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक कालावधीसाठी लागू केलेली संपूर्ण शिक्षण फी ही संबंधित शैक्षणिक संस्थेस अदा करावी. याशिवाय एकाच कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलांना परदेश शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल शासनाच्या या निर्णयामूळे समाजातील सर्व गटातील विद्यार्थ्यी या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
या योजनेंतर्गत महाराष्ट्रातील अनूसूचित जातीच्या प्रवर्गातील पदव्युत्तर पदवी आणि पी.एच.डी.साठी अद्ययावत (Qs World University Ranking) २०० च्या आतील परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या ७५ विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. योजनेसंबंधी शासनाच्या www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ताज्या घडामोडीमध्ये विस्तृत माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ३५ वर्ष व पीएचडीसाठी ४० वर्ष ही कमाल वयोमर्यादा असेल. भारतीय आयुविज्ञान परिषदेच्या संकेतस्तळावरील MD व MS अभ्यासक्रमच प्रवेशासाठी पात्र असतील. अधिक माहितीसाठी संकेतस्थळास भेट द्यावी.
