विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांचा गौरव केल्यास त्यांची ईच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर त्यांच्याकडून केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परीसरातील इतर शेतकऱ्यांना होईल, यादृष्टीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या रब्बी हंगामामध्ये पिकस्पर्धा मागील वर्षाप्रमाणे तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर राबविण्यात येत आहेत. त्यानुसार सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या ५ पिकांसाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याला एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल. शेतकऱ्याच्या स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज प्रपत्र-अ, ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, सातबारा, ८-अ चा उतारा, आदिवासी असल्यास जात प्रमाणपत्र, पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित सातबारा वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहे. स्पर्धेची अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर आहे.
स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी ३०० रुपये व आदिवासी गटासाठी १५० रुपये राहील. सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुका पातळीवर पहिले बक्षिस रुपये ५ हजार, दुसरे ३ हजार, तिसरे २ हजार रुपये. जिल्हा पातळीवर पहिले १० हजार रुपये, दुसरे ७ हजार, तिसरे ५ हजार रुपये तसेच राज्य पातळीवर पहिले बक्षिस ५० हजार, दुसरे ४० हजार, तिसरे ३० हजार रुपये राहील.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिकस्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे संकेतस्थळ www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे कळविण्यात आले आहे.
