विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : महिला उद्योजकांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेंतर्गत १ ते २५ लाख रुपयांपर्यंत भरीव आर्थिक सहाय्य देण्यात येते. या योजनेसाठी जास्तीत जास्त संख्येने महिला उद्योजकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.
या योजनेसाठी ५ ऑगस्टपर्यंत www.msins.in या संकेतस्थळावर अर्ज करता येतील. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत क्र. २, सिव्हील लाईन्स, नागपूर येथे संपर्क साधवा.
स्टार्टअप पात्रता निकष –
महिला उद्योजकांनी स्थापन केलेल्या स्टार्टअपची नोंदणी ही उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागांतर्गत झालेली असावी. महिला उद्योजक अथवा त्यांचा स्टार्टअप हा महाराष्ट्रातीलच असावा. महिला उद्योजकाच्या स्टार्टअपची वार्षिक उलाढाल १० लाख ते १ कोटी रुपयांपर्यंत असावी. आश्वासक, नावीन्यपूर्ण, प्रभावी व रोजगार निर्मिती करणाऱ्या स्टार्टअप्सना प्राधान्य देण्यात येईल असे प्रसिध्दी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
