Latest Posts

पुणे : लोहगाव विमानतळावरून अबू धाबीसाठी नवीन विमानसेवा २ डिसेंबरपासून

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / पुणे (Pune) : पुणे शहरातील लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पुणे ते अबू धाबी हे नवीन आंतरराष्ट्रीय विमान उड्डाण २ डिसेंबरपासून सुरू होणार असल्याची घोषणा एअर इंडिया एक्सप्रेसने शनिवारी (८) केली.

पुणे विमानतळावरून दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी रात्री ८.५० वाजता विमान उड्डाण घेईल आणि अबू धाबीला रात्री १०.४५ वाजता पोहोचेल. परततांना, अबू धाबी येथून विमान रात्री ११.४५ वाजता निघेल आणि पुण्यात पहाटे ४.१५ वाजता पोहोचेल, अशी माहिती एअर इंडिया एक्सप्रेसने दिली.

सध्या पुणे विमानतळावरून दुबई, बँकॉक आणि सिंगापूर यांसारख्या प्रमुख आंतरराष्ट्रीय गंतव्यांसाठी विमानसेवा सुरू आहे. नवीन सेवा म्हणून अबू धाबी विमानसेवा सुरू होत आहे. हे पुणेकर प्रवाशांसाठी एक मोठा दिलासा असून, युरोप आणि यूएईतील विमानसेवा सुरू करण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून होती. त्यानुसार एअर इंडिया एक्सप्रेसने सिंगापूर आणि बँकॉक विमानसेवा सुरू केल्यानंतर आता अबू धाबीसाठी ही सेवा सुरू केली आहे.

पुणे एक महत्त्वाचे केंद्र बनेल –
पुणे ते अबू धाबी या विमानसेवेने पुणे एक महत्त्वाचे हवाई वाहतूक केंद्र बनेल, विशेषतः युरोपकडून येणाऱ्या प्रवाशांसाठी. यामुळे विमानतळ प्रशासनाची जबाबदारी वाढली आहे. प्रवाशांना सुलभ आणि आरामदायक प्रवास सुविधा मिळवून देण्यासाठी विमानतळ प्रशासन कटिबद्ध आहे, अशी माहिती पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांनी दिली.

प्रवाशांना थेट सेवा मिळणार –
अबू धाबीला जाण्यासाठी प्रवाशांना पूर्वी दिल्ली किंवा मुंबईला जावे लागत होते. पण आता पुण्यातून थेट विमान सेवा सुरू होणार आहे, ज्यामुळे पुणेकर प्रवाशांना मोठा फायदा होईल. थेट विमानसेवेने प्रवाशांची होणारी गैरसोय कमी होईल, अशी प्रतिक्रिया व्यावसायिक आदित्य सोळंकी यांनी व्यक्त केली.

आशा व्यक्त केली जात आहे की, भविष्यात पुण्यातून आणखी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होईल.

Latest Posts

Don't Miss