Latest Posts

पुण्यात थंडीचा कडाका वाढला : तापमानात मोठी घट

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / पुणे (Pune) : पुणे शहरात गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमानात मोठी घट झाल्यामुळे थंडीचा कडाका वाढला आहे. हवामान खात्याने पुढील दोन ते तीन दिवसांत तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

शहरात पहाटे आणि रात्री थंडीची तीव्रता अधिक जाणवते, तर दिवसा सूर्यप्रकाश असला तरी हवेत गारवा टिकून आहे, ज्यामुळे थंडीचा अनुभव कायम आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात रविवारी (१६) किमान तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली. पाषाण परिसरात किमान तापमान १०.१ अंश सेल्सिअस, तर शिवाजीनगर परिसरात १०.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. यामुळे पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात गारठा वाढला आहे.

सोमवारी (१७) पुणे आणि परिसरात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान ११ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहील. मंगळवारपासून तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानुसार, कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते.

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यात बोचरी थंडी जाणवत आहे. पुण्यात देखील गेल्या दोन-तीन दिवसांपासून थंडीचा प्रभाव अधिक वाढला आहे. यामुळे नागरिकांनी रात्री शेकोट्या पेटवणे सुरू केले आहे.

पुण्यातील रविवारचे किमान तापमान (१६ नोव्हेंबर) –

वडगावशेरी : १६.६ अंश
लवळे : १६.४ अंश
चिंचवड : १५.३ अंश
कोरेगाव पार्क : १४.७ अंश
भोर : १३.७ अंश
दौंड: ११.१ अंश
बारामती : १०.५ अंश
पाषाण : १०.१ अंश
माळीण: ९.९ अंश
हवेली : ८.६ अंश

हवामान विभागाने पुढील काही दिवस गारठा कायम राहणार असल्याचे सांगितले आहे, त्यामुळे नागरिकांनी थंडीपासून बचावासाठी तयारी ठेवावी, असे सुचवले आहे.

Latest Posts

Don't Miss