Latest Posts

पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील लाभार्थी संख्येत घट : अडीच लाख शेतकऱ्यांना वगळले

– केंद्र सरकारच्या नवीन निकषामुळे २१ व्या हप्त्याच्या वितरणात मोठा फरक

विदर्भ न्युज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / पुणे (Pune) : पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या २१ व्या हप्त्याच्या वितरणामध्ये केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन निकषांमुळे राज्यातील अडीच लाख शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. यासाठी आधार, प्राप्तिकर, आणि शिधापत्रिका पोर्टलच्या माध्यमातून शेतकरी कुटुंबांचे उत्पन्न आणि सदस्यांची तपासणी सुरू केली आहे.

२१ व्या हप्त्याच्या वितरणाची संख्या ९० लाख ४१ हजार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली आहे, जे २० व्या हप्त्याच्या तुलनेत २ लाख ५० हजार शेतकऱ्यांनी कमी आहे. यापूर्वी, २० व्या हप्त्यात २ ऑगस्ट रोजी ९१ लाख ९१ हजार शेतकऱ्यांना त्रैमासिक ६ हजार रुपयांचा निधी देण्यात आला होता.

केंद्र सरकारने पीएम किसान योजनेत कुटुंबाच्या व्याख्येत बदल केला आहे. पती-पत्नी आणि १८ वर्षाखालील मुले यांचा एकत्रित हप्ता असावा, परंतु काही कुटुंबांमध्ये दोघांनीही नोंदणी केली होती. अशा कुटुंबांमध्ये पतीचा हप्ता थांबवून पत्नीचा हप्ता चालू ठेवला जात आहे. यामुळे राज्यात ६० हजार शेतकऱ्यांना १९ व्या हप्त्याच्या तुलनेत वगळण्यात आले.

योजनेतील शेतकऱ्यांची संख्या घटल्यामुळे १ हजार ८०८ कोटी २५ लाख रुपयांचा निधी वितरित केला जाणार आहे. तथापि, नवीन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या यामध्ये समाविष्ट नाही, त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

निकषांचे स्पष्टीकरण –
केंद्र सरकारने पात्र शेतकऱ्यांची यादी तपासण्यासाठी आधार, प्राप्तिकर आणि शिधापत्रिका पोर्टलचा वापर केला आहे. यानंतर, राज्य सरकारकडून भूमिअभिलेख नोंदणी आणि बँक खाते आधार संलग्न करून शेतकऱ्यांची माहिती अद्ययावत केली जात आहे.

Latest Posts

Don't Miss