Latest Posts

पोर्ला येथे आ. डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते भव्य वाचनालय बांधकामाचे भूमिपूजन

– ग्रामविकासाच्या माध्यमातून शिक्षण, संस्कृती आणि श्रद्धेचा संगम – आमदार डॉ. मिलिंद नरोटे

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli): आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा वार्षिक निधी योजनेअंतर्गत पोर्ला येथे भव्य व सुसज्ज वाचनालय बांधकामाचे भूमिपूजन आज मोठ्या उत्साहात पार पडले. विधिवत पूजन करून आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी कुदर टिकास मारून भूमिपूजनाची औपचारिक सुरुवात केली. ग्रामस्थ, महिला मंडळ, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम धार्मिक व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

या वाचनालयाच्या माध्यमातून गावातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे युवक तसेच वाचनाची आवड असलेले नागरिक यांना ज्ञानवृद्धीसाठी आणि अभ्यासासाठी एक उत्कृष्ट सुविधा उपलब्ध होणार आहे. ज्ञान हेच खरे बल या भावनेतून उभारण्यात येत असलेला हा प्रकल्प शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवकांना प्रगतीचा नवा मार्ग दाखविणारा ठरणार आहे.

या वाचनालयामुळे पोर्ला परिसरातील शैक्षणिक वातावरण अधिक समृद्ध व प्रेरणादायी होईल. गावातील विद्यार्थ्यांसाठी हे वाचनालय केवळ एक सुविधा नसून त्यांच्या स्वप्नांना आकार देणारे आणि ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणारे केंद्र ठरणार आहे.

थोडक्यात भाषण करताना आमदार डॉ. मिलिंद नरोटे म्हणाले –
गावांचा सर्वांगीण विकास फक्त रस्ते, वीज आणि पाणीपुरवठा यापुरता मर्यादित नसतो. तो तेव्हाच घडतो, जेव्हा गावात ज्ञान, संस्कृती आणि श्रद्धेची ज्योत प्रज्वलित होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरांप्रमाणेच शिक्षणाच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. आपण आपल्या मुलांना शिकवतो, पण त्यांच्या गावातच जर दर्जेदार वाचनालय उपलब्ध झाले, तर तोच विद्यार्थी स्वतःचे आणि गावाचे भविष्य घडवू शकतो. म्हणून अशा प्रकल्पांची गरज आहे.

ते पुढे म्हणाले, ज्ञान हेच खरे बल या विचारातून पोर्ला वाचनालयाची उभारणी करण्यात येत आहे. हे वाचनालय फक्त एक इमारत नाही, तर येथील प्रत्येक विद्यार्थ्याला नवी दिशा, आत्मविश्वास आणि प्रगतीचा मार्ग दाखविणारे ज्ञानकेंद्र ठरेल.

शेवटी आमदार नरोटे म्हणाले की, ही सुविधा केवळ शासनाची किंवा आमदार निधीची नाही, तर संपूर्ण गावाची आहे. ती जपणे, वापरणे आणि पुढील पिढीपर्यंत तिचा फायदा पोहोचविणे – हीच खरी जबाबदारी आहे.

या प्रसंगी माजी जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, पोर्ला सरपंच निवृत्ताताई राऊत, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, अनिल म्हशाखेत्री, ओबीसी मोर्चा जिल्हा महामंत्री रत्नदीप म्हशाखेत्री, भाजप तालुका महामंत्री लोमेश कोलते, पोर्ला उपसरपंच सुजित राऊत, ग्रा.स. मुरखडा सदस्य दिप्तीताई कोरडे, गुरुदेव निमगडे, ग्रा.स. पोर्ला सदस्य अजय चापले, अनिल चापले, रवींद्र सेलोटे, अभिजित कोरडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss