Latest Posts

पोलीस दादालोरा खिडकीतर्फे भरतीपूर्व प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या १०० महिला प्रशिक्षणार्थींचा निरोप समारंभ संपन्न

विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli): गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकी या उपक्रमाअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ४५ दिवसांच्या निवासी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाचा समारोप व निरोप समारंभ आज एकलव्य हॉल, पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथे संपन्न झाला. या प्रसंगी पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या उपस्थितीत १०० महिला प्रशिक्षणार्थींनी आपले प्रशिक्षण पूर्ण करून आगामी पोलीस भरतीसाठी सज्ज होत आत्मविश्वास व्यक्त केला.

या प्रशिक्षणाचे आयोजन २७ सप्टेंबर ते ११ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत पोलीस अधीक्षक गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. प्रशिक्षणादरम्यान उमेदवारांना मैदानी चाचणी, लेखी परीक्षा, सायबर जनजागृती, महिला गुन्हे व नवीन कायदे याविषयी तज्ज्ञांकडून सविस्तर मार्गदर्शन देण्यात आले. या काळात सर्व प्रशिक्षणार्थींना गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने लोअर, टी-शर्ट, शूज, अभ्यासक्रम पुस्तके व आवश्यक साहित्य मोफत देण्यात आले.

प्रशिक्षणअखेर घेण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या युवतींचा पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशिक्षणार्थींनी या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत पोलीस भरतीत यश संपादन करण्याचा निर्धार केला.

आजपर्यंत झालेल्या एकूण १३ पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिरांमध्ये २५४३ युवक-युवतींनी सहभाग घेतला असून, त्यापैकी २०५ उमेदवारांची निवड शासनाच्या विविध विभागांमध्ये झाल्याची माहिती देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आलेल्या एक गाव एक वाचनालय या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील ७३ ठिकाणी वाचनालये उभारण्यात आली आहेत. सन २०२१ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून ११ लाख ६९ हजार ७३५ नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला आहे.

मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल म्हणाले, या प्रशिक्षणातून मिळालेल्या संधीचा लाभ घेऊन स्वत:चे परिक्षण करा व आत्मविश्वासाने आगामी पोलीस भरतीस सामोरे जा. आरोग्य, शिस्त आणि अभ्यास या तिन्ही गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्यास यश नक्की मिळेल.

या कार्यक्रमाला अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी., नागरी कृती शाखेचे प्रभारी पोउपनि. चंद्रकांत शेळके, सर्व उपविभागीय अधिकारी, पोलीस अधिकारी, प्रशिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. प्रशिक्षणाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व संबंधित अधिकारी व प्रशिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.

Latest Posts

Don't Miss