Latest Posts

पवनानगर कामशेत येथे कार्तिकी एकादशीच्या दिंडीला अपघात : महिला वारकऱ्याचा मृत्यू, दहा जखमी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / पुणे (Pune): कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने आळंदीला जात असलेल्या वारकऱ्यांच्या दिंडीला आज सकाळी कामशेत परिसरात भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने १० ते १२ वारकऱ्यांना धडक दिली. या अपघातात प्रियंका तांडेल (वय ५५, रा. करळ, ता. उरण) या महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर दहा अन्य जखमी झाले आहेत.

घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, उरण-पनवेल येथील जसळी दिंडी गेल्या चार दिवसांपासून आळंदी कडे निघाली होती. आज सकाळी कामशेत येथील जुन्या पुणे-मुंबई हायवेवर वारकऱ्यांनी चहा-नाश्ता केल्यानंतर रस्ता ओलांडताना कंटेनरने त्यांना जोराची धडक दिली. मृत महिला प्रियंका तांडेल यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी तळेगाव दाभाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आला. जखमी झालेल्या वारकऱ्यांना कामशेत येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

जखमी वारकऱ्यांची नावे –
१. दत्तात्रय विष्णु घरत (वय ६५, रा. चिरनेर, ता. उरण), २. हिराबाई पोसा पाटील (वय ६५, रा. चिरले, ता. उरण), ३. कामिनी दत्तात्रय गांधी (वय २८, रा. चिरले, ता. उरण), ४. अपर्णा अनंत ठाकूर (वय ५०, रा. जासाई, ता. उरण), ५. नंदू अप्पा चोपडे (वय ५५, रा. नायगाव, ता. मावळ), ६. ज्ञानदेव निवृत्ती गाडे (वय ५५, रा. नाणोली, ता. मावळ), ७. तान्हाजी पुनाजी हेमाडे (वय ४०, रा. वडेश्वर, ता. मावळ), ८. प्रभाकर लक्ष्मण तांडेल (वय ६२, रा. करळपाडा, ता. उरण), ९. शारदा ठाकूर (वय ४५, रा. जासाई, ता. उरण), १०. जंदाळा अशोक कुमार (वय ३०, रा. जासाई, ता. उरण) अपघातानंतर कंटेनर चालकाने घटनास्थळावरून फरार होण्याची माहिती आहे. कामशेत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. घटनाक्रमामुळे परिसरात हळहळ आणि संतापाचे वातावरण आहे.

Latest Posts

Don't Miss