Latest Posts

पी.एम. किसान सन्मान निधी योजनेच्या शेतकऱ्यांना मोबाईल क्रमांक अद्यावत करण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व राज्य शासनाच्या नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरु करण्यात आली आहे. या दोनही योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर वार्षिक १२ हजार रुपये जमा करण्यात येत आहे. योजनेचा लाभ मिळण्यासाठी संकेत स्थळावर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी मोबाईल क्रमांक अद्यावत करुन घ्यावा, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

देशातील अल्पभुधारक शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने “प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केलेली असून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये आर्थिक मदत म्हणून देण्यात येत आहे. तसेच, केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अतिरीक्त लाभ म्हणून नमो शेतकरी महा सन्मान निधी ही योजना सुरू करण्यात आलेली असून पी.एम. किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर महाराष्ट्र शासनातर्फे वर्षाला अतिरीक्त सहा हजार रुपये जमा करण्यात येत आहेत. त्यामूळे महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केंद्र शासनातर्फे वार्षिक ६ हजार रुपये  व राज्य शासनातर्फे वार्षिक ६ हजार रुपयेअसे एकंदरीत वर्षाला १२ हजार रुपयाची आर्थिक मदत जमा केली जात आहे. दर चार महीन्यांच्या अंतराने केंद्र शासनातर्फे २ हजार रुपये व राज्य शासनाकडून २ हजार रुपये अशी एकंदरीत रक्कम ४ हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे.

पी.एम. किसान सन्मान निधी योजनेची रक्कम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची पी.एम. किसान पोर्टलवर ई-केवायसी व लँड सिडींग असणे, तसेच बॅंक खात्याला आधार जोडणी पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. सदर बाबी परीपुर्ण नसल्यास शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या पी.एम. किसान सन्मान निधी योजना व राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी या दोन्ही योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही.

पी.एम. किसान पोर्टलवर नोंदणी करतेवेळी जिल्ह्यातील ४९९ लाभार्थी शेतकऱ्यांनी चुकीचा किंवा एकच मोबाईल क्रमांक अनेक शेतकऱ्यांच्या नावे नोंदविण्यात आलेला असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामूळे अशा शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना संबंधित कोणतेही एस.एम.एस. प्राप्त होत नाही. अशा शेतकऱ्यांची यादी तालुका कृषि कार्यालयाकडे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तालुका स्तरावरुन सदर यादी संबंधित गावचे कृषि सहाय्यक यांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

चुकीच्या/ डुप्लीकेट मोबाईल क्रमांकाच्या दुरूस्तीसाठी केंद्र शासनातर्फे पी. एम. किसान पोर्टलवर Farmer Corner मध्ये Update Mobile Number ही सुविधा https://pmkisan.gov.in/MobileUpdation_Pub.aspx या लिंक द्वारे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर सुविधा ३१ ऑगस्ट, पर्यंत उपलब्ध असल्याने जिल्ह्यातील ४९९ शेतकऱ्यांनी या सुविधेचा उपयोग करून ३१ ऑगस्ट, त्यांचे पी.एम. किसान खात्यातील नोंदणीकृत मोबाईल क्रमांक अद्यावत करून घ्यावे. अधिक माहितीसाठी क्षेत्रीय स्तरावरील मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. असे जिल्हा आधिक्षक कृषि अधिकारी, रमेश देशमुख यांनी कळविले आहे.

Latest Posts

Don't Miss