– गणेशपिपरी परिसरात वाघाचा दहशतजनक वावर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrpur): गोंडपिपरी तालुक्यातील गणेशपिपरी परिसरात कापूस तोडत असलेल्या महिलेला वाघाने ठार केल्याची घटना शनिवारी, २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजताच्या सुमारास घडली. या हल्ल्यात अल्का पांडुरंग पेंदोर (वय ४५) या महिलेचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेशपिपरी येथील अल्का पेंदोर या दुपारच्या सुमारास शेतात कापूस तोडण्यासाठी गेल्या होत्या. सायंकाळी त्यांच्या पतीने बैलांना घरी नेले, परंतु पत्नी बराच वेळ घराकडे परतल्या नाहीत. त्यानंतर त्यांनी पुन्हा शेतात जाऊन पाहिले असता अल्का पेंदोर यांचा मृतदेह शेतात पडलेला आढळला.
विशेष म्हणजे, आठवडाभरापूर्वी गणेशपिपरीपासून केवळ एक किलोमीटर अंतरावरील चेकपिंपरी गावातसुद्धा वाघाच्या हल्ल्यात एका ७० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या दोन घटनांनंतर परिसरात वाघाचा दहशतजनक वावर निर्माण झाला आहे.
सध्या परिसरात कापूस आणि धान कापणीचा हंगाम सुरू असल्याने शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी वनविभागाने तातडीने वाघ पकडण्यासाठी योग्य बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे.
