Latest Posts

ओबीसी महामंडळाच्या विविध योजनेचा लाभ घ्यावा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : राज्यातील ओबीसी प्रवर्गातील लोकांना स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी बहुजन कल्याण विभागांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्यावतीने २० टक्के बिज भांडवल योजना, थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना, महिला स्वयंसिध्दी व्याज परतावा योजना अशा विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन महामंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

२० टक्के बीज भांडवल योजना- हि योजना राष्ट्रीयकृत बँक, ग्रामिण बँक तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत राबविली जाते यामध्ये महामंडळाचा सहभाग २० टक्के, बँकेचा सहभाग ७५ टक्के व लाभार्थ्यांचा ५ टक्के सहभाग असतो. योजनेंतर्गत लाभार्थ्यांना ५ वर्ष कालावधीच्या परतफेडीसाठी ७ लाख रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध होते.

थेट कर्ज योजना – हि योजना महामंडळामार्फत राबविण्यात येत असून योजनेंतर्गत शेतीला पूरक किंवा इतर छोट्या व्यवसायाकरिता कर्ज दिले जाते.  यामध्ये जास्तीत जास्त १ लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येते परतफेडीचा कालावधी ४ वर्षे असून नियमित परतफेड केल्यास व्याज आकारले जात नाही, परंतु थकीत झालेल्या हप्त्यांवर वार्षिक ४ टक्के दराने व्याज आकारण्यात येते.

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना- हि योजना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत तसेच सहकारी बँकेमार्फत राबविली जात असून गरजू व कुशल व्यक्तींना नवीन व्यवसाय सुरु करण्याकरिता तसेच व्यवसाय वृद्धीकारिता मागणीनुसार १० लाख रुपया पर्यंत कर्ज बँकेमार्फत देण्यात येते. बँकेचे कर्ज नियमित परतफेड केल्यास महामंडळामार्फत जास्तीतजास्त १२ टक्के व्याज दराने परतावा रक्कम अनुदान स्वरुपात लाभार्थीला देण्यात येतो.

शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना- या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरिता देशांतर्गत अभ्याक्रमासाठी प्रवेश घेण्याकरिता १० लाख रुपयापर्यंत तसेच परदेशी अभ्याक्रमासाठी २० लाख रुपये इतके कर्ज बँकेमार्फत दिले जाते. बँकेचे कर्ज नियमित परतफेड केल्यास महामंडळामार्फत १२ टक्के पर्यंत व्याज परतावा रक्कम अनुदान स्वरुपात लाभार्थीला देण्यात येतो.

महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना- हि योजना इतर मागासवर्ग प्रवर्गातील गरीब व होतकरू महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी तसेच राज्यातील बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे उत्पादन प्रक्रिया व मूल्य आधारित उद्योगांकरिता बँकेमार्फत मंजूर करण्यात आलेल्या ५ ते १० लाख रुपयापर्यंतच्या कर्ज रक्कमेवरील १२ टक्के दराने व्याज परतावा उपलब्ध करून देण्यात येतो. सदर योजना महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लोकसंचालीत साधन केंद्र (CMRC) च्या सहाय्याने राबविण्यात येते. या योजनेचा लाभ घेणाच्या महिला इतर मागास प्रवर्गातील व महाराष्ट्राच्या रहिवासी असाव्यात, बचत गटाची नोंदणी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लोकसंचालित साधन केंद्रामध्ये (CMRC) केलेली असावी.

योजनांचा लाभ घेण्याकरिता इच्छुकांनी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ वर्धा यांचे कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, लक्ष्मीनगर, सेवाग्राम स्टेशन रोड, वर्धा, ७१५२-२३२८८१ या दुरध्वनी क्रमांकावर किंवा ९८३४७२४६०६, ७९७२०२९१५० या भ्रमणध्वनी क्रमांकावर तसेच संकेतस्थळ www.msobcfdc.in येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, यांनी केले आहे.

Latest Posts

Don't Miss