Latest Posts

नंदिग्राम एक्स्प्रेसच्या उशिरीमुळे प्रवाशांना होणार त्रास

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नांदेड (Nanded): बल्लारशाह, आदिलाबाद ते मुंबई दादरदरम्यान धावणारी नंदिग्राम एक्स्प्रेस गाडी वेळेवर पोहोचत नसल्याने प्रवाशांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. नांदेडहून दररोज संध्याकाळी ४ वाजून २५ मिनिटांनी सुटणारी ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून ५७ मिनिटांनी दादर स्थानकावर पोहोचणे अपेक्षित असते, मात्र अलीकडच्या काळात या गाडीचे आगमन अनेकदा २५ ते ३० मिनिटांनी उशिराने होत आहे.

गाडीच्या विलंबामुळे विदर्भ व मराठवाड्यातून मुंबईकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पुढे जाणाऱ्या गाड्या चुकत आहेत. डहाणू, पनवेल, नवी मुंबई आणि गुजरातकडे जाणाऱ्या प्रवाशांना वेळेवर कनेक्टिंग गाड्या मिळत नाहीत, ज्यामुळे त्यांना आरक्षित तिकिटांवर पाणी सोडावे लागते, आणि त्यांचा वेळ वाया जातो. मुंबईसारख्या घडीच्या काट्यावर धावणाऱ्या शहरात हा विलंब मानसिक व शारीरिकदृष्ट्या प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत आहे.

विद्यार्थ्यांपासून महिला, शासकीय कर्मचारी, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच या विलंबाचा फटका बसत आहे. २ नोव्हेंबर रोजीही नंदिग्राम एक्स्प्रेस २५ मिनिटे उशिरा दादर स्थानकावर पोहोचली. या सततच्या विलंबामुळे त्रस्त झालेल्या थडीसावळी (ता. बिलोली) येथील प्रवासी तसेच मुंबईतील मराठवाडा मित्रमंडळाचे सदस्य दर्शन भंडारे यांनी दादर रेल्वे प्रबंधकांकडे लेखी तक्रार नोंदवली आहे. त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे गाडीच्या विलंबावर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून प्रवाशांना वेळेवर सेवा मिळवता येईल.

Latest Posts

Don't Miss