– नागपूर आयटीआयला संतश्री संताजी जगनाडे महाराजांचे नाव
– संत कोलबा स्वामींच्या नावे यंत्रमाग महामंडळ
– बांधकाम कामगारांना ५ हजार रुपये अनुदान
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून आज नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील कन्हान नदी वळण योजनेला मंजुरी प्रदान करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आज ही मंजुरी प्रदान करण्यात आली.
नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील कन्हान नदी वळण योजनेला मंजुरी दिल्यामुळे सावनेर, काटोल, नरखेड, कळमेश्वर तालुक्यांना सिंचन सुविधा मिळणार असून, एकूण ३२ हजार २८५ एकरला सिंचन मिळणार आहे. १८७९.२१३ कोटी रुपयांची ही योजना आहे. या योजनेतून ३.२५ टीएमसी इतकी मंजूर क्षमता असून, ३.०४ टीएमसी सिंचनासाठी तर ०.०३ टीएमसी पिण्याच्या पाण्यासाठी वापरणे प्रस्तावित आहे. २०१६ मध्ये या योजनेला गती देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
याशिवाय, गोंदियातील डांगुर्ली उच्च पातळी बंधार्यांसाठी ३९५.४८ कोटी रुपयांना प्रशासकीय मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला. ५ हजार ८६१ हेक्टरला यामुळे सिंचन सुविधा मिळणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून हाती घेण्यात आलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा कार्यान्वित करण्याचाही निर्णय घेण्यात आला. गुरुवर्य कै. लक्ष्मणरावजी इनामदार उपसा सिंचन योजना (जिहे कठापूर), साताराला ५४०९.७२ कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाला मंजुरी देण्यात आली. यातून ३२ हजार ९३७ हेक्टर क्षेत्राला सिंचन मिळणार आहे.
यंत्रमाग महामंडळाला संत श्री कोलबा स्वामी यांचे नाव –
आजच्या मंत्रिमंडळात गवळी, कुंभार, शिंपी, लोहार, नाथपंथीय आदी विविध समाजघटकांसाठी महामंडळे गठीत करण्याचा निर्णय घेतानाच, यंत्रमाग महामंडळ सुद्धा गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. या महामंडळाला विणकर समाजाचे आराध्य दैवत संत श्री कोलबा स्वामी यांचे नाव देण्याची सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आणि तसा निर्णय आज मंत्रिमंडळाने घेतला. संत श्री कोलबा स्वामी यांनी विठ्ठलभक्ती, जातपात विरहित सर्वधर्म समभाव आणि मानवतावादाचा आदर्श निर्माण केला. सुमारे ३०० वर्षांपूर्वीचा त्यांचा काळ. धापेवाडा येथे त्यांनी विठ्ठल- रुख्मिणी मूर्तीची स्थापना केली होती.
नागपूर आयटीआयला संताजी जगनाडे महाराजांचे नाव –
नागपुरातील आयटीआयला संतश्री संताजी जगनाडे महाराजांचे नाव देण्याचा निर्णय सुद्धा राज्य मंत्रिमंडळाने घेतला. हे नाव देण्याची सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत केली होती. राज्यातील बांधकाम कामगार महामंडळाकडे नोंदित बांधकाम कामगारांना ५ हजार रुपये एकरकमी अनुदान देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला. सुमारे २५ लाख बांधकाम कामगारांना याचा लाभ मिळणार आहे.
