Latest Posts

बस प्रवासात महिलेकडून ३ लाख २८ हजारांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : भद्रावतीहून चंद्रपूरकडे बसने प्रवास करणाऱ्या एका महिलेकडून तब्बल ३ लाख २८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजताच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, अर्चना प्रभाकर बुरडकर (५८), रा. अष्टविनायक अपार्टमेंट, जतनगर, आरटीओ ऑफिस, चंद्रपूर या महिला घरकाम करून उदरनिर्वाह करतात. त्या २३ ऑक्टोबर रोजी आपल्या भावाच्या घरी भाऊबीजच्या औचित्याने ओवाळणी करण्यासाठी भद्रावती येथील सुरक्षा नगर येथे आल्या होत्या.

२५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी भाऊबीजचा कार्यक्रम संपवून त्या आपल्या लहान बहिणीसह चंद्रपूरकडे जाण्यासाठी भद्रावती बसस्थानकावर आल्या. सावनेर ते चंद्रपूर जाणाऱ्या एम.एच. ४० ए.क्यू. ६४५० या बसमध्ये बसल्यानंतर काही वेळातच तिकीट काढण्यासाठी पर्स उघडल्यावर पर्सची चैन उघडी असल्याचे दिसून आले. तपासल्यावर ब्राऊन रंगाची छोटी पर्स गायब असल्याचे निदर्शनास आले.

त्या छोट्या पर्समध्ये एकूण ३ लाख २८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने होते. त्यामध्ये सोन्याची चपला कंठी, सोन्याची माळ, दोन अंगठ्या, कानातील झुंके, नथ, मंगळसूत्रातील मणी आणि इतर दागिन्यांचा समावेश आहे. बसमधील आसनाभोवती शोध घेतल्यानंतरही पर्स मिळाली नाही.

या प्रकरणी अर्चना बुरडकर यांनी भद्रावती पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, भद्रावती पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विरेंद्र केदारे करीत आहे.

Latest Posts

Don't Miss