विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / जकार्ता (Jakarta): इंडोनेशियाची राजधानी जकार्ता पुन्हा एकदा हादरली आहे. केलापा गडिंग परिसरातील स्टेट सीनियर हायस्कूल ७२ येथील मशिदीत आज (शुक्रवार, ७ नोव्हेंबर २०२५) सकाळी नमाज पठण सुरू असताना स्फोट झाला. या घटनेत ५० हून अधिक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
ही शाळा नौदलाच्या कंपाऊंडमध्ये असल्याने स्फोटानंतर नौदलाचे कर्मचारी आणि स्थानिक पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसराला वेढा घालून सर्व प्रवेशमार्ग बंद केले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, मशिदीच्या मुख्य हॉलच्या मागील भागातून अचानक मोठा आवाज झाला आणि काही क्षणांतच परिसर धुराने व्यापला. घाबरलेली मुले रडत बाहेर पळाली; धावपळीत काही जण पडल्याने जखमी झाले.
सर्व जखमींना केलापा गडिंग क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. स्फोटानंतर तातडीने पोलिस आणि नौदलाने परिसराची नाकेबंदी केली. बॉम्ब शोध पथकाने मशीद आणि आजूबाजूच्या परिसराची झडती घेतली. प्राथमिक तपासात घटनास्थळावरून काही संशयास्पद वस्तू सापडल्या आहेत. त्यात रिमोट कंट्रोल, एअरसॉफ्ट गन आणि रिव्हॉल्व्हर प्रकारचे शस्त्र यांचा समावेश आहे.
जकार्ता पोलिसांच्या मते, स्फोटाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. घटनेच्या स्वरूपावरून विविध शक्यता तपासल्या जात आहेत. मात्र या क्षणी कोणताही निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल, असे पोलिस प्रवक्त्याने स्पष्ट केले.
दरम्यान, फॉरेन्सिक आणि बॉम्ब निकामी करणारे तज्ज्ञ सापडलेल्या वस्तूंची तपासणी करत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद ठेवण्यात आली असून परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर पोलीस संपूर्ण अहवाल प्रसिद्ध करणार आहेत.
