विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : चंद्रपूर शहरातील मुल रोडवरील मयूर बार अॅण्ड रेस्टॉरंट येथे बुधवारी, १२ नोव्हेंबर रोजी रात्री दोन गटांमध्ये झालेल्या वादातून मारहाणीचा प्रकार घडला. या घटनेत दोन्ही गटांतील युवक जखमी झाले असून, रामनगर पोलिसांकडे परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.
पहिल्या फिर्यादी सुनिल यादव (२६), रा. महाकाली कॉलरी चंद्रपूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्रजित सिंग आणि प्रणय जाधव यांच्यातील वादानंतर प्रणय, प्रफुल जाधव व त्यांच्या दोन साथीदारांनी शिवीगाळ करत मारहाण केली. दरम्यान प्रफुल जाधवने टेबलवरील काचेचा ग्लास व अॅश ट्रे उचलून इंद्रजितच्या डोक्यावर वार केला, यात तो गंभीर जखमी झाला.
दरम्यान, प्रणय जाधव (३९), रा. भानापेठ वार्ड चंद्रपूर यांनी विरोधी बाजूने तक्रार दाखल करून इंद्रजित ठाकुरवर अपमानास्पद टिप्पणी आणि हल्ल्याचा आरोप केला आहे. त्याने सांगितले की, इंद्रजितने काचेचा ग्लास फोडून त्याच्या डोक्यावर वार केला व कुलदीपसह इतरांनी हाताबुक्यांनी मारहाण केली.
दोन्ही जखमींना उपचारासाठी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, रामनगर पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारींवरून परस्पर गुन्हे नोंदवून तपास सुरू केला आहे. पुढील तपास रामनगर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख करत आहे.
