Latest Posts

हरवलेले व चोरीला गेलेले ९० मोबाईल शोधण्यात गडचिरोली पोलिसांचे यश

– सन २०२५ मध्ये आतापर्यंत ३३ लाखांहून अधिक किंमतीचे २१५ मोबाईल शोधून तक्रारदारांना सुपूर्द

विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli): जिल्हा पोलीस दलाच्या सायबर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून हरवलेले आणि चोरीला गेलेले तब्बल ९० मोबाईल फोन शोधून काढण्यात आले असून, या मोबाईलची एकूण किंमत १३ लाख ९७ हजार ३९९ रुपये इतकी आहे. हे सर्व मोबाईल आज पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते संबंधित तक्रारदारांना सुपूर्द करण्यात आले.

सन २०२५ या वर्षात आतापर्यंत सायबर पोलीस ठाणे, गडचिरोली यांचेकडून एकूण ३३ लाख ६४ हजार ५६० रुपये किंमतीचे २१५ मोबाईल फोन शोधून तक्रारदारांना परत करण्यात आले आहेत.

आजच्या कार्यक्रमासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयातील मिटिंग हॉलमध्ये आयोजित समारंभास नीलोत्पल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी मोबाईल हरविल्यास किंवा चोरी झाल्यास नागरिकांनी ceir.gov.in या पोर्टलवर तात्काळ तक्रार नोंदवावी, तसेच या पोर्टलबाबत जास्तीत जास्त जनजागृती करावी, असे आवाहन केले. त्यांनी पुढे सांगितले की, सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून नागरिकांनी सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारची ऑनलाइन फसवणूक झाल्यास १९३० किंवा १९४५ या क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा.

सायबर पोलीस ठाणे, गडचिरोली येथे अत्याधुनिक तांत्रिक कौशल्याच्या आधारे मोबाईल शोधण्याचे कार्य सतत सुरू असते. हरवलेले मोबाईल शोधण्यात या दलाने मागील वर्षी २०२४ मध्ये १९ लाख ३१ हजार ९१२ रुपये किंमतीचे ११९ मोबाईल फोन शोधून तक्रारदारांना परत दिले होते. त्यानंतर जानेवारी ते जून २०२५ दरम्यान ७२ मोबाईल (११ लाख ११ हजार ६०० रुपये) शोधण्यात आले होते.

यशस्वी मोहिमेमागे पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांचे मार्गदर्शन, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) श्री. सत्य साई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुळ राज जी. यांचे सहकार्य लाभले. सायबर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोनि. अरुण फेगडे यांच्या नेतृत्वाखाली मपोउपनि. नेहा हांडे, मपोहवा वर्षा बहिरवार, पोअं. संजीव लेंडगुरे, दिवाकर तनमनवार, भूषण गलगट, राहुल शिवरकर, प्रणय नाकाडे, अंकुश बोधनकर व सिद्धांत बुजाडे यांनी परिश्रम घेऊन ही कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडली.

गडचिरोली पोलिसांच्या या प्रयत्नामुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला असून, जिल्ह्यातील सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे पाऊल महत्वाचे ठरत आहे.

Latest Posts

Don't Miss