विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / पुणे (Pune) : जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, राजगुरूनगर आणि शिरूर परिसरात वाढत्या बिबट्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने युद्धपातळीवर उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे.
या भागातील बिबट्यांना पकडण्यासाठी जिल्हा नियोजन निधीतून २०० पिंजरे तातडीने बसविण्यात येणार असून, आणखी १० कोटी रुपये खर्चून १ हजार पिंजरे खरेदी करण्याचे निर्देश वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले आहेत. पकडलेल्या बिबट्यांचे तातडीने स्थलांतर करण्यात येणार आहे.
शिरूर येथील घटनेनंतर संबंधित नरभक्षक बिबट्याला वन विभागाने जेरबंद केले असून, त्याचे स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या संदर्भात नाईक यांनी मंगळवारी (४) मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीला माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल) एम. श्रीनिवास राव, मुख्य वनसंरक्षक जितेंद्र रामगावकर आणि पुण्याचे वनसंरक्षक आशिष ठाकरे उपस्थित होते. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभाग घेतला.
नाईक म्हणाले, बिबट्यांची संख्या वाढल्यामुळे मानवावर हल्ल्यांच्या घटना वाढल्या आहेत. या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना तातडीने राबविण्यात येतील. नागरिकांच्या जीविताचा प्रश्न असल्याने यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही.
या भागात वनकर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे, शेती व गोठ्यांना विद्युत तारांचे कुंपण लावणे, एआयच्या माध्यमातून बिबट्यांच्या हालचालींची माहिती नागरिकांना देणे, तसेच शेतीला दिवसा पूर्ण ताकदीने वीजपुरवठा करणे अशा उपाययोजना करण्याचे निर्देशही देण्यात आले.
वाढती बिबट्या संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी नसबंदीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला असून, या प्रस्तावाला गती देण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ केंद्रीय वनमंत्र्यांची भेट घेणार आहे. लवकरच मी स्वतः घटनास्थळी भेट देऊन स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करणार आहे, असेही नाईक यांनी सांगितले.
