विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / कुपवाडा (जम्मू-काश्मीर) : जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये शनिवारी सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. लष्कराच्या व्हाईट चिनार कॉर्प्स ने सामाजिक माध्यम X वर दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सुरू करण्यात आलेल्या ऑपरेशन पिंपल अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
एजन्सींकडून मिळालेल्या माहितीनुसार, केरन सेक्टर परिसरात घुसखोरीच्या हालचालींचा संशय आल्यानंतर सुरक्षा दलांनी संयुक्त मोहीम सुरू केली. जवानांनी संशयास्पद हालचाली पाहताच दहशतवाद्यांना घेरले. त्यानंतर झालेल्या चकमकीत दोघे दहशतवादी ठार झाले. सध्या सुरक्षा दलांनी परिसरात मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम हाती घेतली असून, आणखी कोणी दहशतवादी लपलेले आहेत का, याचा तपास सुरू आहे.
दरम्यान, याच आठवड्यात ५ नोव्हेंबर रोजी किश्तवार जिल्ह्यातील छत्तरू भागातही सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. गुप्तचर माहितीच्या आधारे भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी पहाटे संयुक्त मोहीम सुरू केली होती. या मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला आणि प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलांनी कारवाई केली.
व्हाईट नाईट कॉर्प्सने X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, ऑपरेशन छत्तरू अंतर्गत जम्मू – काश्मीर पोलिसांच्या सहकार्याने राबवण्यात आलेली मोहीम अद्याप सुरू आहे. अलीकडच्या काळात जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी घुसखोरीचे प्रयत्न आणि कारवाया पुन्हा वाढत असल्याचे सुरक्षा यंत्रणांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
