विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / उत्तराखंड : उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यातील केदारनाथ धाम ट्रेकिंग मार्गावर रविवारी झालेल्या भूस्खलनात तीन भाविकांचा मृत्यू झाला आहे. मयतांपैकी दोन भाविक महाराष्ट्रातील नागपूर आणि जालना जिल्ह्यातील रहिवासी आहेत. सदर दुर्घटनेत आठ जण जखमी झाले. गौरीकुंड- केदारनाथ ट्रेकिंग मार्गावरील चिरबासा परिसराजवळ सकाळी साडेसात वाजता ही दुर्घटना घडली.
भूस्खलनामुळे डोंगरावरुन दगड आणि मातीचा ढिगारा भाविकांच्या अंगावर कोसळला. घटनेची माहिती मिळताच एसडीआरएफ आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले.
किशोर अरुण पराते (रा. नागपूर, महाराष्ट्र), सुनील महादेव काळे (रा. जालना, महाराष्ट्र) आणि अनुराग बिष्ट अशी मयतांची नावे आहेत. इतर आठ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बचावकार्य अजूनही सुरू असल्याचे एसडीआरएफने सांगितले.
