Latest Posts

कार्तिकी यात्रेसाठी एसटीची मोठी तयारी : राज्यभरातून १ हजार १५० जादा बसेस रस्त्यावर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai) : यंदा श्री क्षेत्र पंढरपूर येथे २ नोव्हेंबर रोजी संपन्न होणाऱ्या कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त भाविक आणि प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) तब्बल ११५० जादा बसेस सोडण्याची तयारी केली आहे. ही माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

पंढरपूर येथील एसटीच्या चंद्रभागा बसस्थानकावरून २८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत जादा बससेवा सुरू राहणार आहे. या बसस्थानकावर १७ फलाट असून सुमारे १ हजार  बसेससाठी सुसज्ज पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या राहण्याचीही सोय येथे करण्यात आली आहे.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी यात्रेदिवशी १२० हून अधिक एसटी कर्मचारी चंद्रभागा बसस्थानकावर तैनात राहतील. वाहन दुरुस्ती व देखभालीसाठी स्वतंत्र पथके स्थापन करण्यात आली असून, शहराबाहेरील बिघाडग्रस्त बसेस दुरुस्त करण्यासाठी विशेष टीम तैनात राहणार आहे. गरोदर आणि स्तनदा मातांसाठी बसस्थानकावर हिरकणी कक्ष उभारण्यात आला आहे.

यात्रा कालावधीत ४० पेक्षा अधिक प्रवाशांचा गट आरक्षणाद्वारे थेट पंढरपूरला प्रवास करू शकतो. या गट आरक्षणात ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी ५० टक्के सवलत, तर ७५ वर्षांवरील प्रवाशांना मोफत प्रवास सुविधा उपलब्ध राहील. भाविकांनी वेळेत गट आरक्षण करून प्रवासाची गैरसोय टाळावी, असे आवाहन प्रताप सरनाईक यांनी केले.

मागील वर्षी कार्तिकी यात्रेदरम्यान एसटीने १ हजार ०५५ जादा बसेसद्वारे सुमारे ३ लाख ७२ हजार भाविकांची ने-आण केली होती आणि या सेवेतील उत्पन्न सहा कोटी रुपये इतके झाले होते. यंदाही लाखो भाविकांच्या सुरक्षित प्रवासासाठी एसटीचे हजारो कर्मचारी रात्रंदिवस सेवेत तत्पर राहतील, अशी ग्वाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

Latest Posts

Don't Miss