विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली (Navi Delhi) : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा लष्करी इतिहास शिकवला जाणार आहे. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू करण्यात येणार आहे. याद्वारे अखंड हिंदुस्थानची संकल्पना आणि हिंदवी स्वराज्यासाठी शिवरायांचा संघर्ष शिकवला जाणार आहे. जेएनयूच्या कुलगुरू प्रा. शांतिश्री धुलीपुडी पंडित यांनी याबाबत माहिती दिली.
छत्रपती शिवाजी महाराज सेंटर फॉर सिक्युरिटी अॅण्ड स्ट्रटेजिक स्टडीज या नावाने अभ्यासक्रम सुरू होणार असून जेएनयूच्या स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजअंतर्गत सुरू केला जाईल. या कोर्समध्ये मराठा लष्करी इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांची नौदल रणनीती, मुत्सद्दीपणा आणि गनिमी युद्धनीती शिकविण्यावर भर दिला जाईल. या कोर्ससाठी पहिल्या पाच वर्षांत सुमारे १५ ते ३५ कोटी रुपये खर्च येऊ शकतो. जुलै २०२५ पासून डिप्लोमा, पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू होणार आहे.
