Latest Posts

चांद्रयान-४ मोहिमेसाठी ISRO ची जय्यत तयारी सुरू

विदर्भ न्युज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली (Navi Delhi) : भारताची चांद्रयान-३ मोहीम यशस्वी झाल्यावर आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोने आता पुढचे पाऊल उचलत चांद्रयान-४ या नवीन मोहिमेची तयारी सुरू केली आहे. ही मोहीम देखील खास असणार आहे.

यात प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून, ही मोहीम दोन टप्प्यांत लाँच केली जाणार असल्याचे बोलले जात आहे. या मोहिमेत चांद्रयान-४ चंद्रावर उतरेल आणि मोहीम पूर्ण झाल्यावर पुन्हा पृथ्वीवर येईल. या मोहिमेची आणखी काही खास वैशिष्ट्यं असतील. मोहिमेच्या या वैशिष्ट्यांबाबत सविस्तर जाणून घेऊया.

इस्त्रो चांद्रयान-३ मोहिमेच्या अभूतपूर्व यशानंतर चांद्रयान- ४ मोहिमेची तयारी करत आहे. मात्र ही नवीन मोहीम पूर्वीच्या मोहिमेसारखी नसेल, या वेळी चांद्रयान-४ चंद्रावर उतरले आणि मोहीम पूर्ण झाली की यान पुन्हा पृथ्वीवर परतेल. चांद्रयान- ३ ही मोहीम एकाच टप्प्यात लाँच करण्यात आली होती. मात्र नवी ही नवीन मोहीम दोन टप्प्यात लाँच केली जाईल. दोन वेगवेगळे लाँच चांद्रयान- ४ च्या व्हेईकलला पुढे नेतील. हे यान केवळ चंद्रावर उतरणार नसून, ते चंद्राच्या पृष्ठभागावरील खडकांचे आणि मातीचे नमूने भारतात घेऊन येईल.

मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात चांद्रयान- ४ पृथ्वीवरून प्रक्षेपित केले जाईल. त्यानंतर ते चंद्रावर उतरेल. चंद्रावर उतरल्यावर ते दिलेली सर्व कामे पूर्ण करेल आणि तेथील नमूने घेऊन ते पुन्हा प्रक्षेपित केले जाईल. लाँचिंग वेळी पहिल्यांदाच चांद्रयान-४ चे एकूण वजन ५ हजार २०० किलोग्रॅम असेल. पण चंद्रावरून पृथ्वीवर लाँच करताना ते पृथ्वीच्या कक्षेत सहजपणे दाखल व्हावे यासाठी त्याचे वजन १ हजार ५२७ किलोग्रॅम ठेवले जाईल.

इस्त्रोच्या प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताचे सर्वात अवजड लाँच व्हेईकल एलव्हीएम-3 तीन कॉम्पोनंटसह प्रक्षेपित होईल. त्यात प्रोपल्शन, डेसेंडर आणि अ‍ॅसेंडर अशा तीन मॉड्युलचा समावेश असेल. हे २०२३ मधल्या चांद्रयान-३ मोहीमेप्रमाणे असेल. त्यानंतर ट्रान्सफर आणि रि-एंट्री मॉड्युलला ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यान अर्थात पीएसएलव्हीवर लाँच केले जाईल. यापैकी पहिले लाँच कोणते होईल, याबाबत इस्त्रोने अद्याप सविस्तर माहिती दिलेली नाही. इंडिया टुडे च्या वृ्त्तानुसार, चांद्रयान-४ मोहिमेत आणखी दोन अतिरिक्त घटक असतील. त्यांना चंद्रावरून नमुने परत आणणे आणि पृथ्वीवर टाकण्याचे काम सोपवले जाईल. याचाच अर्थ चांद्रयान-४ त्याच्यासोबत पाच मॉड्युल घेऊन जाईल. यात अ‍ॅसेंडर मॉड्युल, डिसेंडर मॉड्युल, प्रोपल्शन मॉड्युल, ट्रान्सफर मॉड्युल आणि रीएंट्री मॉड्युलचा समावेश असेल. या प्रत्येक मॉड्युलचे काम वेगवेगळे असेल. चांद्रयान- ३ मध्ये लँडर, रोव्हर आणि प्रपोल्शन असे तीन घटक समाविष्ट होते.

नवीन मोहिमेतील प्रोपल्शन मॉड्युल चांद्रयान-३ प्रमाणेच असेल. प्रोपल्शन मॉड्युल वेगळे होण्यापूर्वी चांद्रयान-४ ला चंद्राच्या कक्षेत मार्गदर्शन करेल. रॉकेटपासून यान वेगळे झाल्यानंतर पृथ्वीच्या कक्षेपासून ते चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्यापर्यंतची जबाबदारी प्रोपल्शन मॉड्युलची असेल. डिसेंडर मॉड्युल चांद्रयान-३ च्या विक्रम लँडर सारखेच चंद्रावर उतरेल. चंद्रावर सर्व नमूने गोळा करण्याचे काम पूर्ण झाल्यावर लँडर अ‍ॅसेंडर मॉड्युलमधून बाहेर पडेल आणि पृथ्वीकडे परतीचा प्रवास सुरू करेल. नमूने गोळा केल्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागावरून उड्डाण करणं आणि ट्रान्सफर मॉड्युलच्या मदतीने लँडरला पृथ्वीच्या कक्षेपर्यंत पोहोचवण्याचे काम अ‍ॅसेंडर मॉड्युलचे असेल.

ट्रान्सफर मॉड्युलला अ‍ॅसेंडर मॉड्युल पकडणे आणि त्याला चंद्राच्या कक्षेतून बाहेर काढण्याचे काम असेल. खडक आणि मातीच्या नमुन्यांसह कॅप्सूल वेगळी होण्यापूर्वी तिला पृथ्वीवर परत आणले जाईल. रिएंट्री मॉड्युल हे चंद्रवरील माती घेऊन जाणारी कॅप्सूल असेल. चंद्रावर गोळा करण्यात आलेले नमूने पृथ्वीवर यशस्वीपणे आणण्याची जबाबदारी रिएंट्री मॉड्युलची असेल.

Latest Posts

Don't Miss