– चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील २२३ विद्यार्थी प्रतिकृतींसह सहभागी होणार
– शिक्षणाधिकारी (माध्य.) वासुदेव भुसे यांची माहिती
विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli): केंद्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभाग तसेच राज्य विज्ञान शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने इन्स्पायर्ड अवार्ड विज्ञान प्रदर्शनी २०२३-२४ व २०२४-२०२५ अंतर्गत निवडप्राप्त विद्यार्थी व मॉडेलचे जिल्हास्तरीय प्रदर्शन १७ व १८ नोव्हेंबर रोजी गडचिरोली येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील एकूण २२३ विद्यार्थी आपल्या प्रतिकृतींसह सहभाग नोंदवणार असून, प्रदर्शनाचे आयोजन अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांचे शासकीय निवासी शाळा, गोंडवाना सैनिकी विद्यालयाजवळ, नवेगाव-चामोर्शी रोड, गडचिरोली येथे करण्यात आले आहे.
या प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षणाधिकारी (माध्य.) वासुदेव भुसे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व समित्यांची बैठक पार पडली. यावेळी उपशिक्षणाधिकारी (प्राथ.) विवेक नाकाडे, उपशिक्षणाधिकारी (माध्य.) अमरसिंग गेडाम, हरिष बावनकर, जी. एम. मडावी, प्राचार्य वैशाली मडावी आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविणे हा मुख्य उद्देश –
इयत्ता सहावी ते बारावीतील विद्यार्थ्यांमध्ये कल्पकता, वैज्ञानिक विचार व नवोपक्रमांना चालना देणे हा इन्स्पायर्ड अवार्ड योजनेचा प्रमुख हेतू आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरातील समस्यांवर वैज्ञानिक उपाय शोधण्यासाठी प्रेरित करणे, संशोधनाची आवड निर्माण करणे व विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात योगदान देण्यास प्रवृत्त करणे या माध्यमातून केले जाते.
मागील दोन वर्षांपासून हे प्रदर्शन होऊ शकले नव्हते. यंदा चंद्रपूर व गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यांसाठी संयुक्तपणे या विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे.
विज्ञानदिंडीने होणार प्रारंभ –
प्रदर्शनाच्या पूर्वसंध्येला १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता विज्ञानदिंडीचे आयोजन करण्यात आले असून तिचा शुभारंभ धानोरा रोडवरील शिवाजी महाविद्यालयापासून होईल आणि समारोप जिल्हा परिषद हायस्कूल, चामोर्शी रोड येथे होईल. यात शालेय विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
उद्घाटन १७ नोव्हेंबरला, पारितोषिक वितरण १८ नोव्हेंबरला –
सदर प्रदर्शनाचे उद्घाटन १७ नोव्हेंबर रोजी सकाळी गोंडवाना सैनिकी विद्यालयाजवळील निवासी शाळा परिसरात होईल. तर १८ नोव्हेंबरला निवड झालेल्या २२ विद्यार्थ्यांना व प्रतिकृतींना पारितोषिक देऊन गौरविण्यात येईल. तसेच १७ नोव्हेंबरच्या सायंकाळी सहभागी विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सर्व सहभागी विद्यार्थी व शिक्षक यांच्या निवास, भोजन, वाहतूक, आरोग्य, पाणी व्यवस्था, शिस्त, प्रसिद्धी व प्रचार यासाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या असून शिक्षणाधिकाऱ्यांनी या सर्व तयारीचा आढावा घेऊन आवश्यक मार्गदर्शन केले.
या प्रदर्शनीत गडचिरोली जिल्ह्यातील ४३ व चंद्रपूर जिल्ह्यातील १८० अशा २२३ प्रतिकृतींचा सहभाग राहणार आहे. विज्ञानप्रेमी विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांसाठी ही प्रदर्शनी एक विज्ञान पर्वणी ठरणार आहे.
शिक्षणाधिकारी (माध्य.) वासुदेव भुसे यांनी आवाहन केले की, जिल्ह्यातील सर्व शाळांनी आठवी ते बारावीतील विद्यार्थ्यांना या प्रदर्शनाला घेऊन यावे, जेणेकरून त्यांच्यात विज्ञानाविषयी जागृती निर्माण होईल. या संदर्भातील पुढील बैठक १३ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली असल्याची माहिती भुसे यांनी दिली.
