– वरोड्यात ४४४ दुबार मतदार
– पुरुष मतदारापेक्षा महिलांची संख्या जास्त
– निवडणूक निर्णय अधिकारी यांची पत्रकार परिषद
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / वरोरा (Warora): वरोडा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काल १७ नोव्हेंबर उमेदवारी अर्ज भरण्यास पासून सुरुवात झाली. वरोडा नगर परिषदेच्या निवडणुकीत एकूण ४३३२९ मतदार असून ते शहरातील ४६ मतदान केंद्रावर आपल्या मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती येथील उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संदीप भस्के यांनी आज ११ नोव्हेंबरला नगर परिषदेच्या सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
वरोडा नगरपरिषदेसाठी १० नोव्हेंबर पासून सुरू झालेली नाम निर्देशन प्रक्रिया १७ नोव्हेंबर तीन वाजता बंद होणार असून हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याचे आवाहन त्यांनी केले. ऑनलाइन अर्ज भरून अर्जाची झेरॉक्स प्रत निवडणूक अधिकाऱ्याकडे देणे आवश्यक आहे.
संभाव्य उमेदवारांना आपल्यावर कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल नसल्याचे शपथपत्र १७ नोव्हेंबरला तीन वाजेपर्यंत देण्याचे बंधन आहे. उमेदवाराच्या अर्जाची तपासणी १८ नोव्हेंबरला होणार असून या तपासणीत काही त्रुटीमुळे फेटाळले गेलेल्या उमेदवारांना या विरोधात जिल्हा न्यायालयात दाद मागता येईल. जिल्हा न्यायालय यावर तीन दिवसात निर्णय देणार असून यात भेटायला गेलेल्या अर्जदाराचा अर्ज मंजूर झाला तर तो स्वीकारला जाईल.
स्वीकारलेले उमेदवारी अर्ज उमेदवारांना २१ नोव्हेंबर पासून २५ नोव्हेंबर पर्यंतच्या तीन वाजेपर्यंत परत घेता येणार आहे. २६ डिसेंबरला उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून त्याच दिवशी चिन्हाचे वाटप केले जाईल अशी माहिती त्यांनी पत्र परिषद दिली. नगर परिषदेच्या निवडणुकीत शहरातील ४३३२९ मतदार असून यात ४ तृतीयपंथीय मतदारांसह २१४९९ पुरुष व २१८२६ महिला मतदारांचा समावेश आहे.
शहरातील एकूण मतदारांपैकी ४४४ दुबार मतदार ओळखण्यात आले असून या दुबार मतदारांना मतदान करण्याच्या दिवशी कोणत्या प्रभागात मतदान करणार आहात याची पसंती मागितली जाईल. त्यांच्याकडून दुसऱ्या मतदान केंद्रावर मतदान करणार नाही असे हमीपत्र घेतल्यानंतरच त्यांची ओळख पटवून झाल्यानंतरच त्यांना मतदान करण्यात करता येणार आहे. हमीपत्र दिल्यानंतरही त्यांनी दुसऱ्या प्रभागात मतदान केलेच तर त्यांच्यावर नियमानुसार निवडणूक आयोगातर्फे कारवाई करण्यात येण्यात असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली. मतदानाच्या दिवशी प्रत्येक प्रभागातील प्रत्येक मतदारांना एक नगराध्यक्ष व दोन नगरसेवक असे तीन मत द्यावे लागणार आहे.
मतदारांना आपले मतदान कोणत्या प्रभाग व केंद्रावर आहे हे mahsecvoterlist.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. निवडणुकीदरम्यान होणाऱ्या अवैध प्रकारांना आळा घालण्यासाठी शहरातील रत्नमाला चौक, आनंदवन चौक माढेळी, वणी व मोहबाळा या मार्गावर तपासणी केंद्र उभारण्यात येणार असून दोन भरारी पथक नेमण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली.
नगरपरिषद निवडणुकीसाठी असलेल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना निवडणुकीत ११.२५ लाख रुपये तर नगरसेवकास ३.५० लाख रुपये खर्चाची मर्यादा असल्याचे त्यांनी सांगितले.
वरोडा नगरपरिषदेच्या निवडणुकीत मतदारांनी कोणत्याही आमिषाला व दबावाला बळी न पडता सुज्ञपणे मतदान करण्याचे आवाहन त्यांनी या पत्रकार परिषदेत केले. पत्रकार परिषदेला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ मेश्राम उपस्थित होते.
