Latest Posts

पवित्र कार्तिक पौर्णिमेला मिर्झापूरमध्ये भीषण रेल्वे अपघात : सहा भाविकांचा मृत्यू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मिर्झापूर (Mirzapur): उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातील चुनार रेल्वे स्टेशनवर पवित्र कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी एक हृदयद्रावक रेल्वे अपघात घडला. एक्सप्रेस ट्रेनने धडक दिल्याने सहा भाविकांचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व भाविक गंगेत स्नान करण्यासाठी जात होते. ते चोपन-प्रयागराज पॅसेंजर ट्रेनने चुनार स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर उतरले होते. स्थानकावर उतरल्यावर, पुलाचा वापर न करता, घाईगडबडीत या भाविकांनी थेट रेल्वे रुळ ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी, विरुद्ध दिशेने वेगाने येणाऱ्या हावडा-कालका नेताजी मेल एक्सप्रेस ट्रेनने त्यांना धडक दिली आणि यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

सकाळी ९.३० च्या सुमारास घडलेला हा अपघात अत्यंत भीषण होता. मृतदेहांचे अवयव विखुरले गेल्यामुळे घटनास्थळी दृश्य भयावह होते. घटनास्थळी मोठा गोंधळ आणि आरडाओरड माजली.

घटनेची माहिती मिळताच जीआरपी आणि आरपीएफचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि मदतकार्य सुरू केले. प्रशासनाने अपघाताच्या कारणांचा तपास सुरू केला आहे.

Latest Posts

Don't Miss