विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / अहमदाबाद (Ahmedabad) : गुजरात दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) मोठे यश मिळाले असून, आयएसआयएस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी संबंध असलेल्या तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे. हे तिन्ही संशयित मागील वर्षभरापासून एटीएसच्या रडारवर होते. अडालज परिसरात शस्त्र पुरवठा करताना एटीएसने ही कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले तिन्ही संशयित मूळचे हैदराबादचे असून, ते नव्याने सक्रिय झालेल्या दहशतवादी मॉड्यूलशी जोडलेले होते. या तिघांकडून देशाच्या विविध भागांत दहशतवादी हल्ले करण्याचा कट रचला जात होता. मात्र, एटीएसच्या सतर्कतेमुळे हा कट वेळेतच उधळला गेला.
गुप्त माहितीच्या आधारे आज सकाळी एटीएसने अडालज येथे ही कारवाई केली. या वेळी संशयितांकडून शस्त्रास्त्र पुरवठ्याशी संबंधित महत्त्वाचे पुरावे हाती लागल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
सदर कारवाईनंतर राज्यातील सुरक्षायंत्रणा अधिक सतर्क झाली असून, या प्रकरणाबाबत गुजरात एटीएस लवकरच पत्रकार परिषद घेऊन अधिकृत माहिती जाहीर करणार आहे. या यशस्वी कारवाईमुळे संभाव्य दहशतवादी हल्ला रोखण्यात यश मिळाले असून, एटीएसच्या दक्षतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
