Latest Posts

गोंदिया येथील शासकीय विश्रामगृहामध्ये राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केली आदिवासी समुदायाबद्दल चर्चा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया (Gondia) : महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी गोंदिया येथील शासकीय विश्रामगृहामध्ये ३० सप्टेंबर ला विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधला. या चर्चेत आदिवासी समुदायाची ओळख आणि त्यांच्या विकासाबाबत चर्चा करण्यात आली.

राज्यपाल महोदयांनी आदिवासी विकास विभागाच्या वतीने निवडक आदिवासी महिला बचत गट, वनधन विकास केंद्र, प्रगतीशील प्रतिनिधी आणि यशस्वी विद्यार्थीनी यांच्याकडून जिल्ह्यातील आदिवासी समाजाबद्दल विविध प्रश्न व समस्यांची माहिती घेतली.

आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त शिला उईके यांनी राणी दुर्गावती वनधन बचत गट केंद्र अर्जुनी मोरगाव अंतर्गत १५ बचत गटांमधील ३०० महिला सदस्यांची माहिती दिली. वनधन केंद्रास एकात्मिक आदिवासी विकास विभागाकडून १५ लाख रुपयांचा निधी मिळाला असून, या निधीतून मोहफुलापासून विविध उद्योग विकसित करण्यात आले आहेत. वर्षाला ३ लाख रुपयांचे उत्पादन झाल्याची माहिती शीलाताई उईके यांनी दिली.

सरस्वती महिला बचत गटाने २०१७ पासून बांगडी, साडी पिन, टायपिंग आणि कोट बटन उद्योग सुरू केला आहे, ज्यातून दर महिन्यात १५ ते २०हजार रुपये उत्पन्न मिळत असल्याचे अध्यक्ष सुनंदा डोये व सचिव ममता राजकुमार कोराम यांनी सांगितले.

यावेळी वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त अशोक दयाराम काठेवाल यांनी आदिवासी विकास विभागाच्या योजनांचा लाभ घेऊन तुती लागवड व्यवसाय सुरू केला असून, यामधून दर महिन्यात १०ते १५ हजार रुपये उत्पन्न मिळत असल्याचे सांगितले.

देवरी प्रकल्पातील कु. खुशी रमेश वाढीवे आणि कल्याणी बलदेव काटेवार या दोन विद्यार्थ्यांनी मिशन शिखरच्या सहाय्याने महाराष्ट्र लॉ युनिव्हर्सिटी नागपूर येथे BBA LLB च्या प्रवेशासाठी यश प्राप्त केले. राज्यपाल महोदयांनी त्यांच्या यशाबद्दल विचारपूस केली.

जिल्हाधिकारी प्रजित नायर व देवरी प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी उमेश काशिद यांनी आदिवासी समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना व इतर बाबींची माहिती मा.राज्यपाल महोदयांना दिली. (उमेश काशिद) प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,
देवरी, जि. गोंदिया

 

Latest Posts

Don't Miss