विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : गोंडपिपरी पोलिसांनी गडचिरोली जिल्हा सीमेवरील दारूतस्करीवर कारवाईची धडक मोहीम सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांनी दारूविक्रेत्यांवर कायद्याचा आसूड ओढला आहे. आंतरजिल्हा सीमेवर लावण्यात आलेल्या चेक पोस्टवर मंगळवारी हजारो रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला.
निवडणूक काळात अनुचित घडू नये, यासाठी गोंडपिपरीचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांनी जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांची तैनाती वाढविली आहे. बंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात दारूची तस्करी पोलिसांनी रोखली. गोंडपिपरी पोलीस स्टेशन हद्दीत येथील अधिकारी व अंमलदार पेट्रोलिंग करीत होते. यादरम्यान पोलिसांनी सीमेवरील तारसा एसएसटी पॉइंटवर संशयित दुचाकी क्रं एमएच ३३ एई ०५४५ थांबवून तपासणी केली असता, या दुचाकीतून १९८ नग देशी दारू अंदाजे किंमत ६ हजार ९३० रुपये जप्त करण्यात आली. यावेळी दुचाकीसह ६६ हजार ९३० रुपयांचा मुद्देमाल अवैधरीत्या वाहतूक करताना गोंडपिपरी पोलिसांना मिळून आला. या कारवाईत सोनू बाबूराव मडावी (२३), संगीता बालकराम मडावी (३६) या आरोपींना ताब्यात घेण्यात आले. दोन्ही आरोपी गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली येथील असून, त्यांच्याविरुद्ध दारूबंदी अधिनियम कलम ६५ अ, ई, ८३ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर कारवाई ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मंगेश कराडे, पोलीस अंमलदार निखाडे, अतुल तोडासे, गायकवाड, गव्हारे यांनी केली.
