Latest Posts

नाशिकपासून मुंबईपर्यंत गारठा वाढला : विदर्भातही हीच स्थिती

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली (Navi Delhi) : देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये आणि सीमेपलिकडे असणाऱ्या पर्वतीय क्षेत्राकडून शीतलहरींचा प्रवाह मागील काही दिवसांमध्ये वाढल्यामुळे हा प्रवाह आता महाराष्ट्रापर्यंत परिणाम दाखवताना दिसत आहे. तिथे दक्षिण भारतही हा शीतलहरींनी प्रभावित होताना दिसत आहे. उत्तरेकडून येणाऱ्या गार वाऱ्यांचा झोत वेगाने राज्यात येत असल्यामुळे नाशिक, विदर्भात तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. कोकणातील काही भागही येथे अपवाद ठरत नाही.

सध्याच्या घडीला राज्यात थंडीला पोषक हवामान असल्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा शेवट थंडीनेच होणार असल्याचा अंदाज आहे. तिथे नाशिकमध्ये तापमान १२.४ अंशांवर पोहोचला आहे, तर जळगावात १३.२ अंश सेल्सिअस, महाबळेश्वरमध्ये १३.२ अंश, साताऱ्यात १४.५ अंश, कोल्हापुरात १७.२ अंश इतके तापमान आहे. विदर्भातही हीच स्थिती असून, नागपुरात पारा १३.६ अंश, गडचिरोली येथे १४ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार हिमालय क्षेत्रासह उत्तर भारतात पश्चिमी झंझावात अर्थात एक तीव्र थंड हवेचा झोत सक्रीय असल्यामुळे उत्तर भारतात थंडी वाढली आहे. याच उत्तर भारतीय राज्यांमधून येणाऱ्या वाऱ्यामुळे राज्यभरात थंडीचे प्रमाण येत्या दिवसात वाढण्याचे संकेत मिळत आहेत. राज्याच्या किनारपट्टी क्षेत्रामध्येही वातावरणात बदल झाले असून, किमान आणि कमाल तापमानाच घट होताना दिसत आहे.

मागील काही दिवसांपासून आणि येत्या काही दिवसांमध्येही देशासह राज्यात थंडीसाठी पूरक वातावरण राहणार असून, महाराष्ट्रात शीतलहरींमध्ये अडथळे आणणारे कोणतेही घटक सक्रिय नसल्यामुळे गुलाबी थंडी बोचऱ्या थंडीचे रुप धारण करू शकते. त्यातच आकाश निरभ्र असल्यामुळे पंजाब, हरयाणा आणि राजस्थान दरम्यान असणाऱ्या हवेच्या उच्च दाब क्षेत्रामुळे ईशान्यकडून महाराष्ट्राकडे येणाऱ्या थंड कोरड्या वाऱ्यामुळे थंडीचा कडाका आणखी वाढणार आहे.

मुंबईच्याही कमाल तापमानात घट –
फक्त पुणे, नाशिक, नागपूरमध्येच नव्हे, तर आता मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही हवेत गारवा जाणवण्यास सुरुवात झाली आहे. असे असले तरीही मुंबई शहर आणि उपनगरांतील नागरिकांना पहाटेच्या वेळी  गारवा आणि दुपारी उष्मा अशा विचित्र हवामानाला तोंड द्यावे लागत आहे. पुढील ४८ तासांनंतर थंडीचे हे प्रमाण शहरासह राज्याच्या बहुतांश भागात आणखी वाढेल असाही अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Latest Posts

Don't Miss