– ५०० कैदी कारागृहातून पळाले : दहशतवाद्यांचाही समावेश
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / बांग्लादेश (Bangladesh) : बांग्लादेशात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान शेख हसीना यांनी काल ६ ऑगस्टला आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि देशातून पलायन केले.
त्यामुळे आता बांग्लादेशात अंतरिम सरकार स्थापन झाले असून, यात सैन्य, पत्रकार, उद्योगपती, अर्थशास्त्री, राजकारणी अशा व्यक्तींचा समावेश असेल. शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतरही सध्या हिंसाचाराने बांगलादेश धुमसत असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या बांगलादेशातील घडामोडींकडे संपूर्ण लक्ष लागले आहे.
बांगलादेशात विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे हिंसाचार शिगेला पोहोचला आहे. शेख हसीना यांनी सोमवारी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर सत्ता लष्कराच्या हाती गेली. मात्र, आंदोलकांनी देशाची सत्ता लष्कराकडे देण्यास विरोध दर्शवला आहे. दरम्यान, हिंसक जमावाने कारागृह देखील सोडले नाही. कारागृहात घुसूनही जमावाने जाळपोळ केली. यावेळी अनेक कैदी पळून गेले. या कैद्यांमध्ये अनेक दहशतवाद्यांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत भारतीय लष्करही अलर्ट मोडवर आहे.
बांगलादेशच्या माध्यमांमधून समोर आलेल्या बातम्यांनुसार, देशात सत्तापालट झाल्यानंतर परिस्थिती आणि व्यवस्था कोलमडली आहे. दरम्यान, देशातील तुरुंगही रिकामी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बांगलादेशात रविवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून कर्फ्यू लागू करण्यात आला होता. मात्र, सोमवारी हिंसक आंदोलकांनी कर्फ्यु झुगारुन शेख हसीना यांच्या घराला घेराव घातला. एवढंच नाही तर, कर्फ्यू दरम्यानच शेरपूर कारागृहात हल्लेखोर लाठ्या घेऊन घुसले आणि जवळपास ५०० कैद्यांना कारागृहातून बाहेर काढले.
आंदोलकांकडून जाळपोळ –
आंदोलकांनी शेरपूरच्या कारागृहातच नव्हे तर दमदमा कालीगंज परिसरातही घुसून आग लावली. शेरपूरचे उपायुक्त अब्दुल्ला अल खैरुन यांनी सांगितले की, सायंकाळी पाचच्या सुमारास हल्लेखोरांनी कारागृहावर हल्ला केला. सोमवारी संतप्त जमावाने फक्त कारागृहातच नव्हे तर पोलीस ठाण्यांनाही लक्ष्य केले. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सदर पोलीस ठाण्याला हल्लेखोरांनी आग लावली. याशिवाय, जिल्हा परिषद, जिल्हा निवडणूक कार्यालय, सोनाली बँक तसेच अनेक दुकानांची तोडफोड करण्यात आली.
बांग्लादेशातील विद्यार्थी आरक्षणाविरोधात आंदोलन करत होते. हिंसक आंदोलनानंतर शेख हसीना सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या, मात्र त्यानंतरही त्यांनी आंदोलन संपवले नाही. शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलकांनी सुरू केली. वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ५ ऑगस्ट रोजी शेख हसीना यांनी राजीनामा दिला आणि भारतात आश्रय घेतला. सध्या त्या हिंडन एअरबेसवरील सेफ हाऊसमध्ये आहेत.
