विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : दिवसेंदिवस शेती हा तोट्याचा व्यवसाय ठरत चालला आहे. ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध नसल्याने युवकांचे लक्ष शहराकडे जात आहे. युवकांना गावातच रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सुरु केली आहे. केंद्र शासनाच्या आर्थिक मदतीतून जिल्ह्यात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सन २०२०-२१ या वर्षापासून राबविली जात आहे. या योजनेत आजवर नागपुर जिल्ह्यातील कच्च्या मालावर प्रक्रिया करणाऱ्या ५४३ उद्योगाना अर्थसहाय्य देण्यात आलेले आहे. ही योजना कृषि विभाग, उमेद आणि एनयूएलएम यांच्या संयुक्त विद्यमाने राबविली जात आहे.
काय आहे सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना?-
१. या योजनेंतर्गत कच्च्या मालावर प्रक्रिया उद्योग उभारायचे आहेत. यात दोन फायदे आहेत. कच्च्या मालास ग्राहक उपलब्ध होईल. प्रक्रिया केल्याने जास्त माल विकता येईल. यामुळे स्थानिक स्तरावर रोजगार उपलब्ध होईल.
कागदपत्रे काय लागतात?-
२.शेतकरी गटाच्या सदस्याचे आधारकार्ड, पॅनकार्ड, इलेक्ट्रिकल बिल, जागेचा नमुना-८ आदी कागदपत्रे अर्ज करतेवेळी सादर करता येतात. ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
कोणाला अर्ज करता येईल?-
वैयक्तिक, बचत गट, शेतकरी गट, संस्था, अग्रो कंपनी यापैकी कोणालाही अर्ज करता येईल, सातबारा नसला तरी याचा लाभ घेता येणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याची गरज आहे. www.pmfme.mofpi.gov.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
शासनाकडून काय मदत मिळते?-
योजनेचा लाभ घेण्यासाठी दाखल केलेला प्रस्ताव मंजूर होईपर्यंत कृषि विभागमार्फत पाठपुरावा व मार्गदर्शन केले जाते. प्रकल्प किमतीच्या ३५% जास्तीत जास्त १० लाख अनुदान शासन देते.
योजने अंतर्गत लाभार्थी नोंदणी अभियान ३० सप्टेंबरपर्यंत सुरू असल्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी, कृषी पर्वयेक्षक, कृषी सहायक, जिल्हा स्तरावर जिल्हा नोडल अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी यांच्याशी संपर्क करावा.
