विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / पुणे : दिवाळीत शहरातील वेगवेगळ्या भागांत ५४ ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे गंभीर घटना टळल्या, तसेच सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहर तसेच उपनगरात मोठ्या प्रमाणावर आतषबाजी करण्यात येते. लक्ष्मीपूजनानंतर सायंकाळी सात ते रात्री दहापर्यंत ३५ ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. तर २८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर दरम्यान ६० आगीच्या घटना घडल्या. अग्निशमन दलाच्या जवानांच्या तत्परतेमुळे गंभीर घटना टळल्या. सुदैवाने आगीच्या घटनांमध्ये कोणी गंभीर जखमी झाले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली. २०२१ मध्ये दिवाळीत २१, २०२२ मध्ये १९ तर २०२३ मध्ये ३५ आगीच्या घटना घडल्या होत्या. यावर्षी आगीच्या घटनामध्ये दुपटीने वाढ झाली आहे.
या ठिकाणी लागल्या आगी –
कळस येथे रस्त्यावर कचरा पेटला, मांजरी, मोरे वस्ती येथे उसाच्या शेतामध्ये आग, बालेवाडी फाटा, काका हलवाई स्वीटसमोर वायर पेटली, कोथरूड, रामबाग कॉलनी येथे झाडाला आग, मार्केट यार्ड गेट क्रमांक पाचजवळ कचर्याच्या वाहनामधील कचरा पेटल्याने आग, सहकारनगर पोलिस चौकीजवळ नारळाच्या झाडाला आग, मंगलदास रस्ता येथे झाडाला आग, गणेश पेठ, बुरूड आळी येथे ताडपत्री पेटल्याने आग, कात्रज, संतोषनगर येथे इमारतीच्या गॅलरीमध्ये आग, रविवार पेठ, तांबोळी मशीदनजीक कपड्याच्या दुकानात आग, बी. टी. कवडे रस्ता, भारत फोर्ज कंपनी समोर एका ट्रकला आग, लक्ष्मी रोड, विजय टॉकीजजवळ घरामध्ये आग, कळस स्मशानभूमीजवळ एका शेतामध्ये आग, टिळक रस्ता, महाराष्ट्र मंडळ शेजारी झाडाला आग, सिंहगड रोड, नवश्या मारुतीजवळ घरामध्ये आग, औंध, बीआरटीएस रस्ता येथे घरामध्ये आग, गणेश पेठ, डुल्या मारुती मंदिराजवळ छोट्या गोडाउनमध्ये आगीची घटना, वडगाव बुद्रुक, गोसावी वस्ती येथे घरामध्ये आग, कल्याणीनगर, गोल जिम चौक येथे मोकळ्या मैदानात आग, गणेश पेठ, बुरूड आळी येथे पुन्हा ताडपत्रीला आग, चंदननगर, खराडी बायपास येथे कचरा पेटला, शिवणे, दांगट पाटील नगर येथे कपड्याच्या गोडाउनमध्ये आग, पद्मावती, पंचवटी मित्र मंडळ येथे गॅलरीमधे आग, सासवड रोड सोनाई गार्डनजवळ पीव्हीसी पाइप गोडाउनला आग इत्यादी सुमारे ६० आगीच्या घटना घडल्या.
