Latest Posts

फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव ओसरल्यानंतर उत्तरेकडील वारे देशभरात गारठा आणणार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / श्रीनगर (Srinagar) : जम्मू-काश्मीरमध्ये थंडी वाढल्याने या केंद्रशासित प्रदेशातील अनेक जिल्ह्यांतील पारा गोठणबिंदूच्या खाली घसरला आहे. श्रीनगरमध्ये तापमान उणे दोन नोंदवण्यात आले. राजस्थानातही थंडीने जोर पकडल्याने किमान तापमान ५ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. राजधानी दिल्लीत या हंगामातील सर्वाधिक थंडी शनिवारी अनुभवायला मिळाली. दिल्लीत किमान तापमान ७.१ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले असून, फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव ओसरल्यानंतर उत्तरेकडील वारे देशभरात गारठा आणणार आहेत.

दक्षिण काश्मीरचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या काझीगुंड शहरातील तापमान उणे २.४ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. वार्षिक अमरनाथ यात्रेसाठीचे आधार शिबिर असलेल्या पहलगाम येथे उणे ४.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. पहलगाम येथे शुक्रवारी रात्री उणे ६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हे तापमान चालू हंगामातील सर्वात कमी तापमान होते. प्रसिद्ध स्की रिसॉर्ट गुलमर्ग येथे उणे ३.६ अंश सेल्सिअस, कुपवाडा येथे उणे ३.६ तर कोकरनाग येथे उणे २.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दुसरीकडे राजस्थानातील थंडी हळूहळू वाढत असून, शुक्रवारी रात्री सीकर येथे पाच अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. शनिवारी सकाळच्या २४ तासांपर्यंत सीकरमध्ये ५ तर चुरू येथे ५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

Latest Posts

Don't Miss