Latest Posts

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली : धान झाकण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा वीज पडून मृत्यू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : खरीप हंगामाचे पीक लवकरच घरी येणार, या आशेने दिवाळीचा सण उत्साहात साजरा करणाऱ्या शेतकऱ्यांचा आनंद अवकाळी पावसाने हिरावून घेतला आहे. शनिवारी संध्याकाळी उत्तर गडचिरोलीसह जिल्ह्याच्या अनेक भागात झालेल्या पावसाने शेतात कापणी करून ठेवलेल्या धानाच्या पिकाला मोठा फटका बसला आहे.

दरम्यान, कोरची तालुक्यातील केसालडाबरी गावात शेतातील धानाच्या गंजीला ताडपत्री झाकण्यासाठी गेलेल्या एका १७ वर्षीय विद्यार्थ्याचा वीज पडून मृत्यू झाला, तर दुसरा युवक जखमी झाला आहे.

शनिवारी दुपारी ही दुर्दैवी घटना घडली. मृत विद्यार्थ्याचे नाव सरगम सोमनाथ कोरचा (१७, रा. मसेली) असे असून तो छत्रपती विद्यालयात शिक्षण घेत होता. जखमी युवकाचे नाव योगेश घावळे (१७, रा. गुजूरबडगा, जि. गोंदिया) असे आहे.

प्राप्त माहितीनुसार, सरगम आणि त्याचा नातेवाईक योगेश हे दोघे शेतातील धानाच्या गंजीवर ताडपत्री झाकण्यासाठी गेले होते. यादरम्यान पाऊस सुरू झाल्याने त्यांनी मोहाच्या झाडाखाली आश्रय घेतला. नेमके त्याच वेळी विजांचा कडकडाट होत झाडावर वीज कोसळली. यात सरगम गंभीररित्या भाजून जागीच कोसळला, तर योगेश जखमी झाला. काही अंतरावर असलेले सरगमचे वडील थोडक्यात बचावले.

दोघांनाही तत्काळ कोरची ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी सरगमला मृत घोषित केले. योगेशला प्राथमिक उपचारांनंतर चिचगड (गोंदिया) येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हवामान खात्याचा इशारा – आणखी तीन दिवस पावसाचे सावट –
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, २५ ते २८ ऑक्टोबरदरम्यान गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस, तर काही भागात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ऐन कापणीच्या हंगामात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

कापणी, काढणी किंवा तोडणी केलेला शेतमाल पावसामुळे खराब होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी तो सुरक्षित ठिकाणी साठवावा, तसेच वीज कडकडाटाच्या वेळी झाडाखाली अथवा मोकळ्या जागेत थांबणे टाळावे, असा इशारा कृषी विभागाने दिला आहे.

Latest Posts

Don't Miss