– वनविभागाला माहिती असूनही उपाय न केल्याने नागरिकांत संताप
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : नागभिड तालुक्यातील तळोधी (बालापूर) जवळील आकापूर शेतशिवारात आठवडाभरापासून दिसणाऱ्या वाघाने आज शनिवार, २५ ऑक्टोबर सकाळी एका शेतकऱ्याचा बळी घेतला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मृतकाचे नाव वासुदेव लक्ष्मण वेठे (५५), रा. आकापूर असे आहे.
माहितीनुसार, गेल्या आठ दिवसांपासून आकापूर परिसरात वाघ फिरत असल्याची माहिती नागरिकांनी तलोधी वनपरिक्षेत्र कार्यालयाला दिली होती. मात्र वनविभागाने कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याने आज ही दुर्दैवी घटना घडली. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी घटनास्थळी दाखल झालेल्या महिला वनपरिक्षेत्र अधिकारी शाह यांचा घेराव केला.
सुरक्षा उपाययोजना आणि वाघ पकडण्यासाठी खात्रीशीर आश्वासन मिळेपर्यंत मृतदेह उचलणार नसल्याचा इशारा दिल्याने तब्बल तीन तास तणावाचे वातावरण होते. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर पंचनामा करून मृतदेह नागभीड ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.
वासुदेव वेठे यांचे गावापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर शेती आहे. त्यांनी शेतात धानाची पिके घेतली असून शुक्रवार २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पिकाची पाहणी करण्यासाठी ते शेतात गेले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत न परतल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला.
आज सकाळी शोधमोहीम सुरू असताना शेताच्या कडेला त्यांचा मृतदेह सापडला. घटनास्थळी वाघाचे पगमार्क आढळून आले असून वाघाच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वनविभागाने व्यक्त केली आहे.
ग्रामीणांचा आरोप आहे की, परिसरात वाघ दिसत असूनही वनविभागाने ना पिंजरे लावले, ना कॅमेरे बसवले, तसेच सुरक्षा उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळेच एका निर्दोष शेतकऱ्याचा जीव गेला, असा आरोप नागरिकांनी केला. त्यांनी शेतशिवारात बंधारे उभारणे, झाडीझुडपी साफ करणे आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
जानेवारीपासून आतापर्यंत ३५ जण वन्यप्राण्यांचे बळी –
चंद्रपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेला लागून असलेल्या तालुक्यांमध्ये अशा घटनांचे प्रमाण वाढले आहे. जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत तब्बल ३५ जणांचा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. यामध्ये ३१ जण वाघाचे, दोन बिबट्या आणि प्रत्येकी एका अस्वल व हत्तीच्या हल्ल्यात बळी पडले आहेत.
परिसरात दिसले वाघाचे जोडपे –
आकापूर परिसरात काही दिवसांपूर्वी दोन वाघ एकत्र फिरताना ग्रामस्थांनी पाहिल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे या भागात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण अधिकच गडद झाले आहे.
