विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : तालुक्यातील विसापुर येथील शेत मजूर चे काम करणाऱ्या मुलीचे पोलीस विभागात निवड झाल्याने गावकऱ्यांनी तिची मिरवणूक काढून सत्कार केले.
तोहगावला असताना कर्जाला कंटाळून वडीलाने ती लहान असतानाच विष प्राशन करून शेतात आत्महत्या केली. अचानक आलेल्या संकटामुळे आईने न खचता दोन्ही लहान मुलाला घेवून विसापूर येथे माहेरी आपले वडील व भाऊ यांच्या आधाराने शेत मजुरी करत आपला संसाराचा गाडा हाकलला, दोन्ही मुलाला शिकविले. मुलीला आई कलावतीच्या संघर्षाची जाणीव लहानपणापासूनच होती. तिने आपल्या आईला मदत करत जिद्दीला परिश्रमाची जोड देत अभ्यास केला व आज विसापूर येथील मोनिका प्रकाश शेरकी ची निवड छत्रपती संभाजी नगर येथे पोलीस विभागात झाली.
ती विसापूर येथे ६ ऑगस्ट ला पोहचताच गावकरी, मित्र परिवार व आप्तेष्टांनी तिच्या संघर्षाचे कौतुक करत तिचे जंगी स्वागत केले, पुष्पवर्षाव करत मिरवणूक काढली व तिचा सत्कार केला. हे प्रेम बघून मोनिकाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते.
मोनिका ही लहानपणापासून अतिशय कष्टाळू स्वभावाची होती. आईला प्रत्येक कामात मदत करत तिने कोणत्याच कामासाठी लाज बाळगली नाही. आपल्या आजोबांच्या शेतातील भाजीपाला ती स्वतः बाजारात विकायचे असो किंवा शेतातील कोणतेही काम अशी ती हिरहिरीने करत असे. आपल्यावर वडिलाचे छत नाही एका आत्महत्याग्रस्त शेतकरी असलेल्या वडिलाचे मुलगी आहे व गरिब आहे. याचा बाऊ न करता परिस्थितीवर मात करीत तिने गावातील चिंतामणी विद्यालयात शिक्षण घेतले. तिथे तिला शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन मिळाले त्या आधारे कठोर परिश्रम व चिकाटीने अभ्यास करत तिने हे यश संपादन केले. एवढ्या संघर्षातून कोणतीही पार्श्वभूमी नसताना तिने पोलीस खात्यात यश मिळविल्याने तिचे कौतुक करण्यासाठी विसापूर गावकरी, उलमाले व शेरकी परिवार स्वतः समोर आले गावातून तिची मिरवणूक काढली. पुष्पवर्षाव केला त्यामुळे ती अक्षरशः भारावून गेली परिस्थिती कशीही असो परिश्रम जिद्द आणि चिकाटी व योग्य मार्गदर्शन बळावर यश संपादन करता येते हे तिने दाखवून दिले.
