Latest Posts

फरीदाबाद : जम्मू काश्मीर पोलिसांनी खतरनाक दहशतवादी षडयंत्राचा पर्दाफाश केला

– ३०० किलो आरडीएक्स, एके ४७ रायफल आणि स्फोटक साहित्य जप्त

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / फरीदाबाद (Faridabad) : जम्मू काश्मीर पोलिसांनी एक मोठा दहशतवादी षडयंत्र उघडकीस आणला आहे. पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी अटक केलेल्या डॉक्टर आदिल अहमदच्या माहितीवरून फरीदाबादमध्ये ३०० किलो आरडीएक्स, एके ४७ रायफल आणि दारूगोळा जप्त केला आहे. पोलिसांच्या मते, हे स्फोटक साहित्य दहशतवादी हल्ल्यांसाठी वापरण्याचा कट असू शकतो.

८ नोव्हेंबर रोजी श्रीनगर पोलिसांनी अनंतनाग येथील सरकारी मेडिकल कॉलेजचे माजी डॉक्टर आदिल अहमद याच्या लॉकरमधून एके ४७ रायफल जप्त केली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या दहशतवादी संघटनांशी असलेल्या संबंधांचा तपास सुरू केला. चौकशीतून डॉक्टर आदिल अहमदने फरीदाबादमध्ये मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा लपवला असल्याचे सांगितले. पोलिसांनी या माहितीच्या आधारावर धाड टाकून ३०० किलो आरडीएक्स आणि एके ४७ रायफल जप्त केली.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी डॉक्टरचे पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांशी घनिष्ठ संबंध होते. तो अनेक वर्षांपासून दहशतवाद्यांना मदत करीत होता. या संपूर्ण नेटवर्कमध्ये अनेक राज्यांतील लोक सहभागी आहेत. सध्या या प्रकरणात आणखी काही अटक होण्याची शक्यता आहे, आणि आरडीएक्सच्या या मोठ्या साठ्याचा टार्गेट काय असू शकतो याचा तपास सुरू आहे.

गुजरात एटीएसने उधळून लावला मोठा दहशतवादी कट –
दरम्यान, गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) एक मोठा दहशतवादी षडयंत्र उधळून लावला आहे. एरंडीच्या बियांपासून ‘रिसिन’ विष तयार करून देशभरात हल्ले करण्याचा कट उधळला गेला. या कारवाईत चीनमध्ये एमबीबीएस केलेल्या एका डॉक्टरसह तिघांना अटक करण्यात आली आहे. या तिघांकडून तीन पिस्तूल, ३० काडतुसे, ४ लिटर एरंडी तेल, तीन मोबाइल फोन आणि दोन लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत.

या तिघांनी लखनौ, दिल्ली आणि अहमदाबादमधील संवेदनशील ठिकाणांची रेकी केली होती. या कटाचा मुख्य सूत्रधार इस्लामिक स्टेट शी संबंधित आहे, अशी माहिती गुजरात एटीएसचे उपमहासंचालक सुनील जोशी यांनी दिली आहे.

देशभरातील दहशतवादी नेटवर्क उघडकीस, आणखी अटक होण्याची शक्यता –
या दोन्ही प्रकरणांमुळे देशभरातील दहशतवादी नेटवर्कच्या संघटनांतील सक्रियता उघडकीस आली आहे. पोलिसांनी सांगितले की, भविष्यात या प्रकरणात आणखी अटक होण्याची शक्यता आहे.

Latest Posts

Don't Miss