विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur): राजुरा तालुक्यातील विरुर येथे दारूच्या नशेत एका इसमाने घरगुती कारणावरून पत्नी व मुलीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी विरुर पोलिसांनी मारोती दिगांबर उपरे (वय ५९ वर्ष, रा. विरुर) याच्याविरुद्ध कलम १०९, ३२६(जी) बीएनएस अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नमाला मारोती उपरे (वय ४९ वर्ष रा. विरुर, वॉर्ड क्र. २ या आपल्या पती मारोती उपरे यांच्यासोबत विरुर येथे वास्तव्यास आहेत. त्यांना दोन मुली असून मोठी मुलगी सुरक्षा उपरे (वय २४ वर्ष) हिचे अलीकडे ऑपरेशन झाल्याने ती माहेरी राहत होती.
१८ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री सुमारे ८.३० ते ९ वाजताच्या दरम्यान, आरोपी मारोती उपरे हा दारूच्या नशेत हातात काठी घेऊन घरी आला. त्याने विनाकारण बडबड करत पत्नी व मुलीस शिवीगाळ केली. त्यानंतर पत्नीने विरोध केल्याने आरोपी घराबाहेरून दरवाज्याची कडी लावून निघून गेला. काही वेळाने तो पुन्हा आला व घराच्या खिडकीतून पेट्रोलसदृश पदार्थ फेकून आग लावली.
क्षणात घरात प्रचंड धूर व ज्वाळा उठल्या. आई-मुलीने आरडाओरड केली असता शेजारील सासू मथुराबाई उपरे यांनी दरवाजा उघडून त्यांना बाहेर काढले. या दरम्यान रत्नमाला यांच्या डोक्यावरील केस, दोन्ही भुवया व पापण्यांना भाजल्या गेल्या, तसेच घरातील लाकडी पलंग, गादी, कपडे, अन्नधान्य व इतर साहित्य जळून खाक झाले.
गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. त्यानंतर जखमी रत्नमाला यांनी उपचार घेत विरुर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. विरुर पोलिसांनी आरोपी मारोती दिगांबर उपरे याच्याविरुद्ध पत्नी व मुलीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
