विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : कृषि विभाग जिल्हा परीषद गडचिरोली मार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना राबविण्यात येत आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती शेतकऱ्याकरीता ही योजना असून त्यांना या योजनेअंतर्गत सिंचन सुविधा व औजारे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या योजनेसाठी समाजकल्याण विभाग व आदिवासी विकास विभागाकडून निधी उपलब्ध करून देण्यात येतो. ३ डिसेंबर २०२४ चे कृषि आयुक्तालयाचे मार्गदर्शक सुचनानुसार सन २०२४-२५ या वर्षापासून सिंचन विहीरीकरीता रूपये ४ लाख, जुनी विहीर दुरूस्तीकरीता रूपये १ लाख, इनवेल बोअर करीता रूपये ४० हजार, विद्यूत जोडणीकरीता रूपये २० हजार, पंपसंच करीता खर्चाच्या ९०% किंवा रूपये ४० हजार, सौर कृषि पंपाकरीता खर्चाच्या ९०% किंवा ३० हजार पर्यंत, तुषार सुक्ष्म सिंचनाकरीता १५% किंवा रूपये ४७ हजार मर्यादेत, ठिबक सिंचन संचाकरीता १५% किंवा रूपये ९७ हजार मर्यादेत पुरक अनुदान, शेततळयाचे प्लॅस्टीक अस्तरीकरण खर्चाच्या ९०% किंवा २ लाख पर्यंत ,एचडीपीई/ पीव्हीसी पाईप खर्चाच्या १००% किंवा ५० हजार पर्यंत, बैलचलित/ ट्रक्टरचलित औजारे- यंत्रसामुग्री रूपये ५० हजार व परसबाग- बियाणे/कलमे/रोपे/खते/औषधे करीता रूपये-५ हजार अनुदान मिळणार आहे. या योजनेकरीता महाडिबीटी पोर्टलचे mahadbt.maharashtra.gov.in /farmer/login/login या संकेतस्थळावर शेतकऱ्यांचे अर्ज मागविण्यात येत आहेत.
या योजनेत लाभ घेण्यासाठी लाभार्थी अनु. जाती, नवबौध्द व आदिवासी शेतकरी असावा. त्याच्याकडे सक्षम प्राधिका-याने दिलेले जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. त्याच्याकडे जमीनधारणेचा ७/१२ असावा. लाभार्थ्याकडे स्वताचे आधारकार्ड असणे आवश्यक आहे. लाभार्थ्याकडे स्वताचे बँक खाते असणे व सदर बँक खाते आधारकार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याकडे किमान ०.४० हेक्टर व कमाल ६.०० हेक्टर एवढी शेतजमीन असणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर लॉटरीव्दारे करण्यात येणार असून अनुदान अदा करण्याची सर्व प्रक्रिया ऑनलाईनच होणार आहे. योजनेच्या सविस्तर माहीतीकरीता पंचायत समितीच्या कृषि अधिका-याशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आयुषी सिंह, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, कृषि विकास अधिकारी किरण खेामणे व प्रदिप तुमसरे जिल्हा कृषि अधिकारी (विघयो) यांनी केले.
