Latest Posts

धारणी उपजिल्हा रुग्णालयात एकाच दिवशी तीन बालकांसह गर्भवती मातेचा मृत्यू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / अमरावती(Amravati) : धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात शनिवारी एक दुर्दैवी घटना घडली. एका गर्भवती मातेचा आणि तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला. धुळघाट रेल्वे आरोग्य केंद्रांतर्गत राहणाऱ्या नर्मदा चिलात्रे (२०, रा. सालाईबर्डी) या गर्भवती महिलेला दुपारी २ : ०० वाजता धारणी उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते.

तिची ही पहिलीच प्रसूती होती. सिझरियन ऑपरेशन दरम्यान तिला अचानक झटके आले. यामुळे तिच्या प्रकृतीत झपाट्याने घट येत गेली आणि दोन वेळा अधिक झटके आल्याने तिचा मृत्यू झाला. यासोबतच तिच्या पोटात असलेले बाळही दगावले.

दुसऱ्या घटनेत, धुळघाट रेल्वे येथील श्रीराम धांडे यांच्या पत्नी कविताने जुळ्या बाळांना जन्म दिला. मात्र, एक बाळ जन्मल्यानंतर अल्पावधीतच मृत्यूला सामोरे गेले.

तिसऱ्या घटनेत, बैरागड येथील सबा तनवीर मो. नदीम यांना २८ आठवड्यांवर प्रसूती झाली. सुमारे ८०० ग्रॅम वजनाचे बाळ जन्माला आले, पण अत्यल्प वजनामुळे आणि नाजूक प्रकृतीमुळे बाळाचे उपचार सुरू असतानाच निधन झाले.

वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मत –
उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दयाराम जावरकर यांनी सांगितले की, गर्भवती महिलांची स्थिती आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या उपचारांची वेळेवर कशी काळजी घेणं महत्त्वाचे आहे. प्रसूती दरम्यान या प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी अधिक दक्षता घेणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

सर्व एकाच दिवशी घडलेल्या या घटनांमुळे क्षेत्रातील आरोग्यविषयक दुर्बलतेवर प्रकाश पडला आहे.

Latest Posts

Don't Miss