– आष्टी येथे भाजपचे उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे यांची जाहीर सभा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / आष्टी (Aashti) : विदर्भात ८० टक्के संपती आहे. गडचिरोली जिल्ह्यात विपुल वनसंपदा व खनिज संपत्ती आहे. खनिज संपतीवर उद्योग सुरु होणार नाही तोपर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील गरिबी दूर होणार नाही. महाराष्ट्रात बांधकाम मंत्री असताना अनेक पुल व रस्ते तयार करण्यात आले. गडचिरोली ते आष्टी या ७० किमी रस्त्यासाठी ४०० कोटी मंजूर केले. वैनगंगा नदीवरील पुलासाठी १०० कोटी मंजूर करुन पुल तयार करण्यात आला. इलेक्ट्रिक वाहने आणली. पर्यवरणाबरोबर विकास झाला पाहिजे. सबका साथ, सबका विकास हे भाजपचे तंत्रे आहेत. काँग्रेस पक्षाने खोटा प्रचार करुन विष पसरविण्याचे काम केले. संविधान बदलविण्याची कुणाची हिंमत नाही, असे प्रतिपादन केंद्रीय परिवहन मंत्री ना. नितीन गडकरी यांनी केले.
आष्टी येथे आयोजित गडचिरोली विधानसभेचे भाजपचे उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे व अहेरी विधानसभेचे महायुतीचे उमेदवार धर्मरावबाबा आत्राम यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
याप्रसंगी ना. धर्मरावबाबा आत्राम, उमेदवार मिलिंद नरोटे, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, शिवसेना जिल्हाध्यक्ष राकेश बेलसरे, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, भाजपच्या महिला अध्यक्ष गीता हिंगे, रवींद्र ओल्लालवार, बबलू हकीम, दिलीप चलाख, रमेश बुरसे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, बंगाली बांधवांना नमोशुद्र जातीत समावेश करुन त्यांचे पुनर्वसन झाले पाहिजे. चेन्ना विकास प्रकल्पासाठी केंद्राकडून निधी मिळवून देण्यासाठी नितीन गडकरी यांनी निधी उपलब्ध करुन द्यावा. आष्टी ते सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गासाठी पाठपुरावा करून १ हजार २०० कोटी मंजूर करुन घेतले.
कार्यक्रमाला परिसरातील तीन हजार नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता.
