– विदर्भातील लॉजिस्टिक पार्कला चालना
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : रोजगार निर्मितीसाठी आजच्या काळातील सुसंगत असलेल्या विविध पायाभूत सेवा सुविधा या आवश्यक असतात. लॉजिस्टीक्सच्या दृष्टीकोणातून नागपूर जिल्ह्यात एमआयडीसी व एक्सएसआयओ वेअरहाऊसिंग प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने १२८० कोटी रूपयांच्या गुंतवणुकीच्या सामंजस्य करारावर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत करारावर स्वाक्षरी करण्यात आली. याद्वारे सुमारे ६ हजार रोजगार प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या उपलब्ध होणार आहे. यावेळी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, मऔवि महामंडळाचे सह. मुख्य अधिकारी अनिल भंडारी, एक्सएसआयओचे व्यवस्थापकीय संचालक आशिष अग्रवाल, विधानपरिषदेचे सदस्य डॉ. परिणय फुके, आमदार आशिष जयसवाल यांची उपस्थिती होती.
नागपूर जिल्ह्यात एक्सएसआयओ लॉजिस्टीक्स व औद्योगिक उत्पादन पार्कचा विकास तीन वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात येणार आहे. एक्सएसआयओ लॉजिस्टिक पार्कमार्फत नागपूरात १२८० कोटी रुपयांच्या थेट परकीय गुंतवणूक करण्यात येत आहे. समृद्धी महामार्गाच्या शेजारी असलेल्या या लॉजिस्टिक पार्कमध्ये यापूर्वी ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून, त्या ठिकाणी सुमारे ४ हजार स्थानिक लोकांसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध झाला आहे. या पार्कमध्ये नागपूरला भारताची लॉजिस्टिक पार्कची राजधानी बनवण्याची क्षमता आहे.
या मेगा प्रकल्पाच्या जलद विकासासाठी आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र सरकार एक्सएसआयओ लॉजिस्टिक समुहाला आवश्यक सहकार्य प्रदान करेल. महाराष्ट्र लॉजिस्टिक पार्क धोरण २०२४ आणि त्यासंबंधित आवश्यक परवानग्या, नोंदणी, संमती आणि आर्थिक प्रोत्साहन देण्यासाठी एमआयडीसी प्रयत्नशिल आहे.
