विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / दिल्ली (Delhi): राजधानी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी एक भीषण स्फोट झाला. सुरुवातीच्या अहवालांनुसार, स्फोटात ९ जणांचा मृत्यू झाला होता आणि २० हून अधिक जखमी झाले होते. पण, नवीन अपडेट्सनुसार मृतांची संख्या १२ झाली असून जखमींची संख्या २५ पर्यंत पोहोचली आहे.
स्फोटाची तीव्रता इतकी होती की त्याच्या धक्क्याने आसपासच्या अनेक वाहनांमध्ये आग लागली आणि रस्त्यावर मोठा गोंधळ उडाला. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, परिसराला आगीने वेढले होते आणि जखमी मदतीसाठी ओरडत होते. जखमींमध्ये गौरी शंकर मंदिरातून परतणारे अंकुश शर्मा आणि राहुल कौशिक यांचा समावेश आहे. अंकुशच्या शरीराचे ८०% भाजले असून त्याची स्थिती गंभीर आहे.
दिल्ली पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा स्फोट आत्मघाती हल्ला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फरिदाबाद मॉड्यूलच्या अटकेनंतर, संशयिताने आत्मघाती हल्ल्याची योजना आखली होती. यावरून तपास एजन्सी प्रत्येक पैलूचा सखोल तपास करत आहेत.
स्फोटानंतर दिल्ली पोलिसांनी शहरात हाय अलर्ट जारी केला असून, प्रमुख रेल्वे स्थानकांवर सुरक्षा वाढवली आहे. रेल्वे संरक्षण दल (RPF) आणि श्वान पथकं तैनात करण्यात आली आहेत. यासोबतच, स्फोटाच्या कारणांबाबत तपास सुरू असून, फॉरेन्सिक पथकं घटनास्थळी काम करत आहेत.
दिल्ली पोलिसांनी बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा (UAPA) आणि स्फोटक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
