Latest Posts

दिल्ली विमानतळावर एटीसी तांत्रिक बिघाडामुळे विमानसेवा विस्कळीत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली (New Delhi) : दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळावर शुक्रवारी सकाळी एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) प्रणालीतील तांत्रिक बिघाडामुळे विमानसेवा विस्कळीत झाली. यामुळे अनेक विमानांना ३० मिनिटांहून अधिक विलंब झाला आणि प्रवाशांना अस्वस्थतेचा सामना करावा लागला.

शुक्रवारी सकाळी एटीसी सिस्टीममध्ये अचानक आलेल्या तांत्रिक समस्येमुळे विमानांचे आगमन आणि प्रस्थान दोन्ही थांबले. यामुळे धावपट्टीवर उड्डाणाची प्रतीक्षा करणारी अनेक विमानं ताटकळत राहिली.

एअर इंडियाच्या एका विमानातील प्रवाशाने सांगितले की, त्यांचे विमान अर्ध्या तासाहून अधिक काळ धावपट्टीवर उड्डाणासाठी थांबले होते. क्रू मेंबर्सने सांगितले की, या विलंबाचे कारण एटीसी सिस्टीममधील तांत्रिक अडचणी आहेत. प्रवाशांना संयम राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रवाशांची गर्दी आणि नाराजी –
या तांत्रिक बिघाडामुळे विमानतळावर बोर्डिंग गेट्सवर प्रवाशांची गर्दी वाढली आहे. वारंवार होणाऱ्या तांत्रिक समस्यांमुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. तथापि, या संदर्भात एअरलाईन्स किंवा विमानतळ प्राधिकरणाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

तांत्रिक टीमने त्वरित कार्यवाही सुरू केली असून, लवकरच विमानसेवा पूर्ववत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Latest Posts

Don't Miss