Latest Posts

महिला डॉक्टरच्या मृत्यूप्रकरणी राज्यातील डॉक्टर संघटनांचा आंदोलनाचा इशारा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai) : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या दुर्दैवी मृत्यूप्रकरणी न्याय मिळावा या मागणीसाठी राज्यातील सर्व प्रमुख डॉक्टर संघटनांनी राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी राज्यभर ओपीडी सेवा बंद ठेवण्यात येणार आहे.

या आंदोलनात निवासी डॉक्टरांचा मोठा सहभाग असणार असून, त्यामुळे सरकारी रुग्णालयातील ओपीडी सेवा ठप्प होण्याची शक्यता आहे. तथापि, अतितत्काळ विभागातील सेवा नियमितपणे सुरू राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबईतील महापालिकेच्या केइएम, सायन, कूपर, नायर, जेजे आणि जीटी रुग्णालयांतील ओपीडी सेवेवर या आंदोलनाचा परिणाम दिसून येणार आहे. या आंदोलनात निवासी डॉक्टर संघटना, वरिष्ठ निवासी डॉक्टर संघटना, इंटर्न्स संघटना, शासकीय वैद्यकीय अधिकारी संघटना आणि इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) या संघटनांचा सहभाग असणार आहे.

डॉक्टरांच्या आंदोलनामुळे रुग्णसेवा खंडित होऊ नये, यासाठी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक रुग्णालयांमध्ये सेवा देतील, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, मुंबई, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे डॉक्टरांच्या सर्व संघटनांनी रविवारी एकत्र येऊन कॅण्डल मार्च काढत या घटनेचा निषेध नोंदविला.

आयएमए आणि शासकीय वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या वतीने ७ नोव्हेंबरपासून ओपीडी सेवांवर बहिष्कार टाकण्यात येणार असून, मागण्या मान्य न झाल्यास १४ नोव्हेंबरपासून सर्व आपत्कालीन सेवा बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनात सर्व निवासी डॉक्टर सहभागी होणार आहेत.

Latest Posts

Don't Miss