विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / लातूर (Latur): लातूर शहरातील औसा राेडवर बुधवारी सकाळी १० वाजता रस्ता ओलांडताना एका ६० वर्षीय वृद्धाचे बसच्या खाली येऊन दुर्दैवी निधन झाले. सुनील गोविंदराव वतनेवकील (वय ६०, रा. अंबुलगा) असे मृतक आजोबांचे नाव आहे. ते लातूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या आपल्या नातवाला पाहण्यासाठी जात होते, त्यावेळी ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील वतनेवकील हे बुधवारी सकाळी दुभाजकाची जाळी ओलांडून मेघमल्हार हाॅटेलसमाेर जात असताना, अचानक एक दुचाकी त्यांच्या जवळून धडकली. त्यानंतर रस्त्यावर पडलेल्या वतनेवकील यांना औशाच्या दिशेने जाणाऱ्या शिवशाही बसने चिरडले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताच्या नोंदीसाठी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस तपास करीत आहेत.
लातूरातील बेशिस्त वाहतूक –
लातूर शहरात रस्ते अपघातांची संख्या वाढताना दिसत आहे. गत वर्षभरात बाभळगाव नाका, छत्रपती चौक, नवीन रेणापूर नाका आणि गरुड चौक येथेही अशाच प्रकारच्या अपघातांमध्ये जीवितहानी झाली आहे.
तसेच, नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाने रस्ते सुरक्षा आणि वाहतूक नियंत्रण कडक करण्याची गरज असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे.
