Latest Posts

आचार संहितासंबधी तक्रारींचे तात्काळ निराकरण करा : निवडणूक निरीक्षक

– एससीसी व एमसीएमसी च्या कामकाजाचा घेतला आढावा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघातून प्राप्त झालेल्या आचार संहितेसंबंधी तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्याचे निर्देश निवडणूक निरीक्षक (सामान्य) जय प्रकाश सिंग व विनय बुबलानी यांनी आज दिले.

आदर्श आचारसंहिता (एमसीसी), सायबर सुरक्षा व तंत्रज्ञान, माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती (एमसीएमसी), मिडीया सेंटर यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी विश्रामगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीत एमसीसीचे नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती (एमसीएमसी) चे नोडल अधिकारी तथा जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, एमसीएमसीचे सदस्य तथा क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, माहिती व तंत्रज्ञान व सायबर सुरक्षा (एनआयसी)चे नोडल अधिकारी नितीन चौधरी, सायबर सेलचे सहायक पोलिस निरीक्षक सुमंतराज भुजबळ, जनसंपर्क अधिकारी बुध्ददास मिरगे यांच्यासह हिंगणघाट व वर्धा विधानसभेचे नोडल अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

नागरिकांनी आचार संहितेच्या भंगा संबंधीत तक्रारी सीव्हीजील ॲप किंवा नियंत्रण कक्षाकडे १९५० या क्रमांकावर करण्याचे आवाहन करून निवडणूक निरीक्षक सिंग व बुबलानी यांनी अधिकाऱ्यांना सुचना दिल्या की, संबंधीत तक्रारींची तात्काळ दखल घेऊन भरारी पथकाला तात्काळ शहानिशा करण्यासाठी पाठविण्यात यावे. सदर तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी दक्ष राहून कार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

स्टार प्रचारक व उमेदवारांच्या जाहीर सभांचे तसेच रॅली व भाषणांचे ध्वनीमुद्रण नियमित करण्यात यावे. त्यात काही आक्षेपार्ह किंवा निवडणूक आचार संहितेचा भंग होत असल्यास तात्काळ दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, तसेच उमेदवारांचे सोशल मिडीया अकाऊंटचे नियमित निरीक्षण सायबर सेल मार्फत करण्यात यावे, प्रिंट माध्यमात येणाऱ्या आचार संहिता भंगाच्या बातम्या, पेड न्यूज व राजकीय जाहिरातींचे सनियंत्रण करण्यात यावे. अशा विविध सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

उमेदवारांकडून इलेक्ट्रॉनिक्स मिडीयात तसेच चित्ररथ व अन्य माध्यमाद्वारे करण्यात येणाऱ्या प्रचार जाहिरातीचे एमसीएमसी समितीकडून पुर्व प्रमाणिकरण करून घेणे आवश्यक आहे. प्रमाणित न केलेल्या जाहिरातींवर आचार संहितेंचे उल्लंघन या अंतर्गत कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

Latest Posts

Don't Miss