विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : राज्यातील महिलांचे आर्थिक स्वातंत्र, त्यांचे आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे, तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भुमिका मजबूत करण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिला व मुलींना दरमहा १ हजार ५०० रुपये देण्यात येणार असून अर्ज ऑनलाइन किंवा ऑफलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. महिला लाभार्थ्यांनी अर्ज स्वत: किंवा अधिकृत माध्यमातून भरण्याचे आवाहन महिला व बालविकास विभागाने केले आहे.
नारी शक्तीदूत ॲपव्दारे स्वत: ऑनलाइन अर्ज भरता येईल. ज्या महिलांना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांना अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामसेवक, समूह संसाधन व्यक्ती/सी.आर.पी., आशासेविका, वार्ड अधिकारी, सिटी मिशन मॅनेजर, मदत कक्ष प्रमुख, आपले सरकार केंद्र याव्दारे ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
लाभार्थ्यांनी अर्ज भरतांना आधार कार्ड वर नमुद केलेले नाव, जन्मतारीख आणि पत्ता याप्रमाणे माहिती भरावी. जर आधारकार्ड मध्ये फक्त जन्म वर्ष लिहिले असेल तर त्याला अद्ययावत करावे लागेल. बँकेचा आय.एफ.एस.सी. कोड ११ क्रमांकाचा असतो. त्यामध्ये चुका होणार नाही, याबाबत काळजी घ्यावी. तसेच बँक खात्याशी आधार क्रमांक सलग्न असणे आवश्यक आहे.
ज्या लाभार्थ्यांनी स्वत: अर्ज ऑनलाइन केलेला आहे अथवा इतर लोकांकडून भरुन घेतले आहे. त्यांनी ऑफलाइन अर्ज अंगणवाडी केंद्रामध्ये देण्याची आवश्यकता नाही. ज्यांना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल अशाच लाभार्थ्यांनी अंगणवाडी सेविकेकडे अर्ज ऑनलाइन किंवा ऑफलाइन जमा करावा, असे बालविकास (नागरी) प्रकल्प अधिकारी किर्ती कुमार कटरे यांनी कळविले आहे.
